गप्पांचा फड अन् चहाचे झुरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:13 AM2021-01-16T04:13:05+5:302021-01-16T04:13:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : निवडणूक आणि तेही ग्रामपंचायतीची म्हटली, तर एक वेगळाच हटके राजकीय रुबाबदार बाणा दिसून येतो. ...

Gossip and tea | गप्पांचा फड अन् चहाचे झुरके

गप्पांचा फड अन् चहाचे झुरके

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : निवडणूक आणि तेही ग्रामपंचायतीची म्हटली, तर एक वेगळाच हटके राजकीय रुबाबदार बाणा दिसून येतो. अगदी निवडणुकीची घोषणा झाली रे झाली की, गप्पांचा फड कधी गावकुशीच्या पारावर, तर कधी पानटपरीवर चांगलाच रंगतो. आजही मतदानाच्या दरम्यान गप्पांचा फड रंगतानाचे आणि सोबतीला चहाचे झुरके घेतानाचे चित्र गावोगावी दिसून आले. अध्येमध्ये हळुवार खटके आणि लगेच सुपारीचे खांड एकमेकांना देत ग्रामपंचायत निवडणुकीचे रागरंग उधळले जात होते.

आपल्या ग्रामपंचायतीत कुणाचा बोलबाला राहणार. मागच्या खेपेस निवडून आलेल्या सदस्य-सरपंचाने काय केले, काय करायला हवे होते, निवडून येताच झालेला बदल, कोण, कसा आणि अमुक उमेदवार निवडून आल्यानंतर काय दिवे लावणार, इथपासून सुरू झालेली ही चर्चा कोरोना, धनंजय मुंडे, शेतकरी कायदा, राहुल गांधी ते थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इथपर्यंत अगदी खमंग, बेभान आणि सुसाट सुटताना दिसून येत होती. या पारावरच्या गप्पांमध्ये वयस्क आणि वृद्ध यांचाच घोळका दिसून येत होता. दुसरीकडे तरुणाई मतदारांची जुळवाजुळव आणि बूथच्या अवतीभवतीच आपली फिल्डिंग लावत होते.

सकाळी ७.३० वाजता ठिकठिकाणी सुरू झालेला हा गप्पांचा फड सायंकाळी मतदान संपल्यानंतरही सुरूच होता. आता मतमोजणीपर्यंत कुणाला, कुठून आघाडी मिळणार, कुणाचे गणित बिघडणार, या चर्चेला चांगलाच जोर येणार आहे. सोबतच निकाल लागल्यानंतर गावगप्पांचा हा फड संवादापासून वाद-विवादापर्यंत राहील, एवढे नक्की!

Web Title: Gossip and tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.