महिला आरक्षणाच्या गप्पाच; २० टक्केही नाही वाटा; जिथे संख्या अधिक, तिथेच महिलांना दिला खो
By योगेश पांडे | Published: October 28, 2023 08:52 AM2023-10-28T08:52:57+5:302023-10-28T09:00:54+5:30
या दोन्ही प्रमुख पक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : काँग्रेस व भाजपतर्फे महिला उमेदवारांना मोठ्या प्रमाणात उमेदवारी जाहीर करण्यात येईल, अशा घोषणा करण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात दोन्ही पक्षांनी राज्यात महिलांकडे दुर्लक्षच केले असून, महिला उमेदवारीचा आकडा २० टक्क्यांहून अधिक गेलेला नाही. यामुळे या दोन्ही प्रमुख पक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. छत्तीसगडमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदार जास्त आहे, हे विशेष.
काँग्रेस व भाजपाने छत्तीसगड विधानसभेच्या सर्व ९० जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाने संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडले होते. पक्षाकडून यंदा महिलांना ३३ टक्के उमेदवारी देण्यात येईल, अशी अपेक्षा हाेती. प्रत्यक्षात पक्षाकडून केवळ १५ महिलांना तिकीट देण्यात आले. तर काँग्रेसच्या प्रदेश प्रभारींनी प्रत्येक लोकसभा क्षेत्रात दोन महिलांना तिकीट देण्यात येईल, अशी घोषणा केली होती. काँग्रेसने केवळ १८ महिलांना उमेदवारी दिली आहे.
काँग्रेसच्या १० महिला आमदार
२०१८च्या निवडणुकीत काँग्रेसने १३ महिलांना तिकीट दिले होते व ११ जणींचा विजय झाला होता. तर भाजपाने १४ महिलांना उमेदवारी दिली होती व १३ जणींचा पराभव झाला होता.
केवळ चार जागांवर थेट महिला लढत
९० जागांपैकी केवळ चार जागांवरच भाजप-काँग्रेसच्या महिलांमध्ये थेट लढत आहे. त्यात प्रतापगड, लैलुंगा, सरायपाली, सारंगढ या विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे.