झालं गेलं...

By admin | Published: December 24, 2016 11:38 PM2016-12-24T23:38:28+5:302016-12-24T23:38:48+5:30

आता नववर्षाच्या स्वागताचे वेध सगळ्यांना लागले आहेत. अर्थात त्याबरोबरीला नववर्षाचे स्वागत आलेच. या उत्साहात गेल्या वर्षी आपण असंच केलं होतं याचीतरी आठवण आपण ठेवतो का?

Got it ... | झालं गेलं...

झालं गेलं...

Next

- रविप्रकाश कुलकर्णी

आता नववर्षाच्या स्वागताचे वेध सगळ्यांना लागले आहेत. अर्थात त्याबरोबरीला नववर्षाचे स्वागत आलेच. या उत्साहात गेल्या वर्षी आपण असंच केलं होतं याचीतरी आठवण आपण ठेवतो का? की आपलं आयुष्य म्हणजे ‘सालोमन ग्रॅन्डी’ या इंग्रजी कवितेत सांगितल्याप्रमाणे साचेबद्ध चाकोरीतलंच आहे? का त्यात बदल होण्यासाठी आपल्यापुढं नववर्षाचं गाजर येतं?
काय असेल ते असो नववर्षाची कल्पना उमेद निर्माण करते हे नक्की. जणू सांगायचं असतं झालं गेलं विसरून जा. नवं आयुष्य सुरू करा... पण अशा वेळीच गेल्या वर्षात आम्हाला काय दिलं याचीपण आठवण ठेवायला हवी. २०१६मधील शेवटचं ‘कलाक्षरे’ लिहिताना मनात मात्र संमिश्र भावना आहेत.
या वर्षातल्या काही घटनांकडं लक्ष वेधावंसं वाटतं. खरंतर, दरवर्षी या कला-सांस्कृतिक घटनांची नोंद घेणारं वार्षिक असायला हवं. पण, कारणं काहीही असोत हे होत नाही एवढं खरं. अर्थात, इच्छाशक्तीचा अभाव हे त्याचं मुख्य कारण हे वेगळं सांगायला नकोच; म्हणून तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार.. मिळणार.. एवढंच ऐकू येतं पण घोंगडं भिजतच पडलं आहे!
चक्रीवादळाचे धोके आणि त्यामुळं होणारी हानी ही आपल्याला आता नवी नाही. म्हणून तर प्रभाकर पेंढारकरांना यासंबंधात कादंबरी लिहावीशी वाटली. यंदादेखील तामिळनाडूत असाच हाहाकार उडाला आहे. यासंबंधात सांगायचं आहे ते थोडं वेगळंच आहे. हिंदी महासागर क्षेत्रातील वादळाला भारत, श्रीलंका, बांगलादेश, थायलंड, म्यानमार, मालदिव आणि ओमान या सदस्य देशांपैकी एक देश नाव देत असतो. आताच्या या वादळाला पाकिस्ताननं नाव दिलं आहे ‘वरदा’ असं वृत्त आलेलं आहे. त्याच्याच पुढं म्हटलं आहे, वरदा म्हणजे ‘लाल गुलाब’. ‘वरदा’संबंधात बातम्या येतच आहेत; पण वरदाचा अर्थ हाच असेल का, असा प्रश्न मनात आला. तपास करता कळलं की इंग्रजीचा मराठी अनुवाद करताना हा गोंधळ झाला आहे!
काय हा गोंधळ आहे? मूळ अरेबिक उर्दू शब्द ‘वरदा’ नसून ‘वर्द’ असा आहे! ‘वर्द-ए-मुरब्बा’ म्हणजे ‘गुलकंद!’ पण, आता प्रश्न असा येतो की या वादळाचा गुलाबाच्या पाकळ्यांशी काय संबंध असू शकेल? अरेबिक - उर्दूच्या जाणकारांनी याबाबत खुलासा करायला हवा. त्यांनी नावात काय आहे? असं म्हणून दुर्लक्ष केलं असेल, तर आता तरी त्यावर प्रकाश टाकावा.
नाव ठेवण्याबाबत आणखी एक वृत्त आहे. मुंबईतील काही रस्त्यांची नावं बदलण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या पटलावर आहे तो असा. बाळगोविंददास मार्ग व सेनापती बापट मार्ग (दादर) यांच्या चौकास नाटककार विद्याधर गोखले यांचं नाव. अंधेरी येथील गुलमोहर क्रॉस रोड नं. १२ला गायक पं. पंढरीनाथ कोल्हापुरे यांचं नाव. जुना प्रभादेवी मार्ग आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाच्या चौकास कविवर्य मंगेश पाडगावकर नाव. गिरगाव येथील आर.आर. रोड व टाटा रोड नंबर २च्या चौकास चित्रकार वासुदेव गायतोंडे यांचं नाव आणि नाना चौकातील जावजी दासजी मार्ग व जागनाथ पथ येथील चौकास गायिका सुमती टिकेकर यांचं नाव देण्यात येणार आहे. या उपक्रमाचं स्वागत करताना मनात विचार येतो की, या चौकांचं नामांतर जरूर होईल; पण ज्या चौकात ज्यांचं नाव दिलेलं असेल त्यांची कामगिरी तिथल्या व इतरेजनांना कशी कळणार? शिवाय या नावाचा संक्षेप करण्याची सवय असते. जसं ‘एम.जी. रोड’ म्हणजे ‘महात्मा गांधी रोड’ वगैरे ही सवय कशी जाऊ शकते?
गावागावांतील रस्त्यांची नावं, चौकांची नावं यात खूप इतिहास दडलेला असतो. यासंबंधात माहिती मिळण्याची सोय करता येईल का? हल्ली स्थानिक इतिहास हा प्रकार रूढ होऊ पाहतो आहे. अभ्यासकांचे इकडे लक्ष जावे.

हा नामांतराचा इतिहासदेखील मनोवेधक ठरेल!
चित्रकार वासुदेव गायतोंडे यांची चित्रं आंतरराष्ट्रीय बाजारात चढ्या भावात विकली गेली आणि गायतोंडे नावाच्या चित्रकाराची आठवण जोमानं जागी झाली! मात्र त्याअगोदर कित्येक वर्षे चित्रकार संपादक सतीश नाईक चित्रकार गायतोंडे यांच्या कारकिर्दीचा, व्यक्तिगत आयुष्याचा बोध घेत होते, त्याचीच परिणती म्हणजे त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रकाशित केलेला ‘गायतोंडे’ हा अपूर्व गं्रथ!
चित्रकाराचं पुस्तक म्हणजे ते परदेशी प्रकाशकांनी थाटमाट करत प्रकाशित करावं असा आपला समज आहे, पण सतीश नाईक यांनी याच तोलामोलाचा किंवा थोडी जास्तच श्रीमंती निर्मिती असलेला गं्रथ प्रकाशित केला. या वर्षातलं हे सर्वोत्कृष्ट पुस्तक ठरलं.
याच पुस्तकातून मजकूर-चित्र उचलून एका इंग्रजी गं्रथाची निर्मिती झाली. कॉपीराईट प्रकरणात हा वाद होईल. मराठी ग्रंथव्यवहारात अनेक गोष्टींवर प्रकाश टाकता येईल असं वाटतं. या दृष्टीकोनातूनही ही घटना या वर्षातील लक्षणीय ठरली.

या वर्षात वसुंधरा पेंडसे-नाईक (जन्म - २७ जून १९४६, मृत्यू - १७ जुलै २०१६) पत्रकार, साहित्यिक , संस्कृत अभ्यासक अशी त्यांची बहुविध ओळख होती. परंतु साहित्य संमेलन स्वयंपूर्ण व्हावं म्हणून त्यांनी महाकोषाची कल्पना मांडली. त्याचा पाठपुरावा केला. मात्र, या संभाव्यतेला मराठी साहित्यप्रेमींनी हवा तेवढा प्रतिसाद दिला नाही. हाच विचार आता अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी उचलून धरला आहे. यासाठी ते जेथे शक्य आहे तेथे भाषणातून ही कल्पना सांगण्याचा आटोकाट प्रयत्न करू लागले आहेत. महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याकडून १ रुपया तर शिक्षक आणि शिक्षण कर्मचाऱ्यांकडून प्रति १० रुपये द्यावेत, असे आवाहन ते करत आहेत. श्रीपाद जोशींच्या या हाकेला सगळ्यांनी प्रतिसाद द्यायला हवा.
हे काम एकट्या श्रीपाद जोशींचं थोडीच आहे? त्यांचे हात बळकट करायला आणखी थोड्यांची गरज आहे हे कसं शक्य होईल?
खरंतर, ही गोष्ट अवघड जागेचं दुखणं झालं आहे. मराठीत सिनेकलावंत, नाट्यकलावंत अशी बरीच गुणी मंडळी आहेत. त्यांच्यापर्यंत ही गोष्ट जात नाही का? त्यांनी मनावर घेतलं तर या कार्यास वेग येऊ शकतो. त्यांच्यापर्यंत आपण जाऊ शकतो का? त्यांच्यापर्यंत ही हाक जाण्यासाठी काय करायला हवं?
या वर्षाचा (शेवटचा नव्हे) हा प्रश्न केव्हातरी सुटायची इच्छा असायला हवी.

Web Title: Got it ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.