‘मिल गया... युग को न्याय मिल गया!
By Admin | Published: February 5, 2016 02:21 AM2016-02-05T02:21:12+5:302016-02-05T02:21:12+5:30
आम्ही त्याच्या जखमेवर मलम लावला होता. रात्री २ वाजेपर्यंत त्याच्यावर उपचार करण्यासाठी धडपड केली होती.
माता-पित्यांनी उलगडले पैलू : १६ महिन्यांची अस्वस्थता
नरेश डोंगरे नागपूर
आम्ही त्याच्या जखमेवर मलम लावला होता. रात्री २ वाजेपर्यंत त्याच्यावर उपचार करण्यासाठी धडपड केली होती. तोच नराधम आमच्या हृदयात कायम भळभळणारी जखम करणार, असा स्वप्नातही विचार केला नव्हता. त्याने जे केले ते आम्ही विसरू शकत नाही अन् त्याचे काही करूही शकत नाही. मात्र, न्यायालयाने युगच्या मारेकऱ्यांना त्यांच्या पापाचे फळ दाखवतानाच आमच्या जखमेवरही फुंकर घातली आहे, अशी भावना युगचे आई-वडील प्रेमल आणि डॉ. मुकेश चांडक यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.
कोर्टाच्या निकालामुळे तब्बल १६ महिन्यानंतर चांडक परिवाराची खदखद शांत होऊ पाहत आहे. युगच्या मारेकऱ्यांना कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्याने पुन्हा कुणी गुन्हेगार दुसऱ्या कुण्या युगचा असा अंत करणार नाही, असे चांडक दाम्पत्यांना वाटते. आज त्यांनी लोकमतशी बोलताना या १६ महिन्यातील दु:खद आठवणीचा नकोसा वाटणारा कप्पा उघडला. युगच्या आई-वडिलांनी युगच्या आठवणीसोबतच मुख्य आरोपी राजेश दवारेच्या क्रूरतेचेही पैलू उघड केले.
अत्यंत हुशार, आज्ञाधारी तेवढाच चंचलवृत्तीच्या युग चांडक (वय ८) या चिमुकल्याचे खंडणीसाठी अपहरण करून आरोपी राजेश धन्नालाल दवारे (वय २०) आणि अरविंद अभिलाष सिंग (वय २४) या दोघांनी अमानुष हत्या केली. १ सप्टेंबर २०१४ च्या या घटनेने चांडक परिवारचे सर्व विश्वच बदलले. या घटनेमुळे प्रमिल आणि मुकेश या आई-वडिलांच्या काळजाला झालेली जखम सारखी भळभळत आहे. दोन दिवसांपासून ती अधिकच दुखरी झाली आहे. न्यायालयाने युगच्या मारेकऱ्यांना दोषी ठरवले. मात्र, त्यांना शिक्षा कोणती होणार, हे स्पष्ट नव्हते. त्यामुळे चांडक दाम्पत्य गेल्या ४८ तासांपासून तीव्र अस्वस्थ होते. बुधवारी न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल गुरुवारी सुनावणार, असे जाहीर केल्यानंतर बुधवारची रात्र चांडक दाम्पत्यासाठी कमालीची मोठी ठरली. दोघेही रात्रभर जागले. झोपेची गोळी घेऊनही त्यांना झोप येत नव्हती. सकाळचे ७ वाजले तेव्हा तोंडावर पाणी मारून चांडक दाम्पत्याने पुन्हा एकदा युगचा अल्बम, त्याचे कपडे, त्याचे बुक्स, खेळणी अन् त्याच्या आवडीच्या सर्वच चीजवस्तू बाहेर काढल्या. प्रेमल(आई)च्या भावना क्षणाक्षणाला तीव्र होत होत्या. अखेर डॉ. मुकेश यांनी पत्नीला सांभाळले.
बाय, आय लव्ह यू, सी यू अगेन
युग अत्यंत हुशार, आज्ञाधारी अन् तेवढाच चंचल होता. तो शाळेत रोजच आपल्या टीचरसाठी एक चिठ्ठी सोडायचा. चुकले तर सॉरी म्हणायचा, शिक्षिकेने शाबासकी दिल्यास त्या चिठ्ठीत थॅक्स लिहिलेले असायचे. शाळेत जाताना आईवडिलांचा चरणस्पर्श करायचा. १ सप्टेंबरला सकाळी तो शाळेत जायची तयारी करीत असताना वडील बाथरूममध्ये होते. त्यामुळे युगने वडिलांना बाहेरूनच आवाज दिला. बाथरूमच्या चौकटीवर डोके टेकवून पप्पांचा आशीर्वाद घेतला. त्यानंतर नेहमीप्रमाणे ‘ बाय, आय लव्ह यू, सी यू अगेन‘ म्हणत घराबाहेर पडला. त्यानंतर तो परतलाच नाही. क्रूरकर्म्यांनी त्याचा घात केला. ज्याच्या जखमेवर आम्ही मलम लावला तो राजेश दवारेच असा करेल याचा अनेक दिवस विश्वासच बसत नव्हता, असे सांगताना चांडक दाम्पत्याला पुन्हा एकदा गहिवरून आले. ते म्हणाले, घटनेच्या दोन महिन्यांपूर्वी रात्री १० ते १०.३० च्या सुमारास मी (डॉ. मुकेश चांडक) घराकडे निघालो होतो. दारोडकर चौकापासून काही अंतरावर गर्दी दिसली. एक तरुण खाली पडला होता. बाजूला गर्दी होती. त्यामुळे वाहन थांबवून गर्दीत डोकावले तेव्हा राजेश दवारे जखमी अवस्थेत विव्हळत होता. त्याच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली होती. त्याला लगेच उचलले. डॉक्टर मित्रांना फोन केले. एक्सरे आणि उपचारानंतर पहाटे १.४५ वाजता तो बरा दिसल्यानंतर त्याला धीर देत घरी परतलो. त्याच्या जखमेवर आम्ही मलम लावला, तो पुढच्या काही दिवसातच असा घात कसा करू शकतो, असा प्रश्न करून डॉ. चांडक यांनी उपस्थित सर्वांच्यांच काळजाचे पाणी केले.