आरक्षण मिळाले, पण महापालिकेत ओबीसींच्या जागा घटणार
By गणेश हुड | Published: July 21, 2022 10:31 AM2022-07-21T10:31:34+5:302022-07-21T10:33:39+5:30
१५१ सदस्य असताना ४१ नगरसेवक, तर आता १५६ सदस्यांत ३५ जणांनाच संधी
गणेश हूड
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता महापालिका निवडणुका ओबीसी आरक्षणासह होणार आहे. परंतु, नागपूर महापालिकेच्या मागील निवडणुकीच्या तुलनेत आगामी निवडणुकीत ओबीसींच्या राखीव जागांची संख्या घटणार आहे.
वर्ष २०१७ मध्ये नागपूर महापालिकेत नगरसेवकांची संख्या १५१ होती. यात ४१ ओबीसी नगरसेवक होते. २०२२ च्या निवडणुकीत नगरसेवकांची संख्या वाढली असून, १५६ होणार आहे. ६ नगरसेवक वाढले, परंतु ओबीसी नगरसेवकांची संख्या कमी होऊन ती ३५ राहणार आहे.
प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. आज अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली होती. प्रक्रियेचा भाग म्हणून अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीसाठी आरक्षण काढण्यात आले आहे. यात अनुसूचित जातीसाठी १९.६५ टक्केसह ३१ जागा राखीव करण्यात आल्या, तर अनुसूचित जमातीसाठी ७.७० टक्केनुसार १२ जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. एकूण आरक्षण ५० टक्केच्या आत ठेवावयाचे असल्याने ओबीसीसाठी २२.६५ टक्के प्रमाणे ३५ जागांचे आरक्षण काढले जाणार असल्याची माहिती निवडणूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. निवडणूक आयोगाकडून याबाबतचे निर्देश लवकरच प्राप्त होतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
निर्देश मिळताच आरक्षण सोडत
सर्वोच्च न्यायालयाने महापालिका निवडणुकीत ओबीसी आरक्षणाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश मिळताच ओबीसी आरक्षणाची सोडत काढली जाणार आहे. मनपाचा निवडणूक विभाग कामाला लागला आहे.
जाती, जमातीच्या आरक्षणाला धक्का नाही
अगामी महापालिका निवडणुकीसाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या आरक्षणाला धक्का न लावता व एकूण आरक्षणाची ५० टक्केची मर्यादा न ओलांडता ओबीसीसाठी आरक्षण काढले जाणार आहे. त्यामुळे २०१७ च्या तुलनेत ओबींच्या ७ जागा कमी होणार आहे.
मनपात असे राहील आरक्षण
प्रवर्ग टक्केवारी जागा
ओबीसी २२.६५ ३५
अनुसूचित जाती १९.६५ ३१
अनुसूचित जमाती ७.७६ १२
एकूण - ५० ७८
टीप - मनपातील नगरसेवकांची संख्या १५६ राहणार आहे.