शासकीय आयुर्वेद रुग्णालय : ३० लाखांतून होणार पंचकर्म विभागाचा विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 11:50 PM2019-03-09T23:50:43+5:302019-03-09T23:51:40+5:30
मेयो, मेडिकलसोबतच आता शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयलाही यंत्र खरेदी व बांधकामासाठी जिल्हा नियोजन समिती निधी उपलब्ध करून देणार आहे. याचा फायदा पहिल्याच वर्षी आयुर्वेद रुग्णालयाला झाला. पंचकर्म विभागासाठी ३० लाख रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली. यामुळे रुग्णालयाच्या विकासाला सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेयो, मेडिकलसोबतच आता शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयलाही यंत्र खरेदी व बांधकामासाठी जिल्हा नियोजन समिती निधी उपलब्ध करून देणार आहे. याचा फायदा पहिल्याच वर्षी आयुर्वेद रुग्णालयाला झाला. पंचकर्म विभागासाठी ३० लाख रुपयांच्या निधीला मान्यता मिळाली. यामुळे रुग्णालयाच्या विकासाला सुरुवात झाल्याचे बोलले जात आहे.
शासकीय आयुर्वेद रुग्णालय प्रशासनाने इतर रुग्णालयांप्रमाणे जिल्हा नियोजन समितीमध्ये (डीपीडीसी) आयुर्वेद रुग्णालयाचाही समावेश करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या मागणीवर सकारात्मकता दाखवित जिल्हाधिकाऱ्यांनी आयुर्वेदाचाही ‘डीपीडीसी’मध्ये समावेश केला. अधिष्ठाता डॉ. गणेश मुक्कावार यांनी ‘डीपीडीसी’कडे पाच वर्षांसाठी २०० कोटींच्या विकासकामांचा बृहत् आराखडाच सादर केला. या आराखड्यात विद्यमान बाह्यरुग्ण इमारतीचे नुतनीकरण करणे, विद्यमान इमारतींच्या नुतनीकरणासह नवीन १३० खाटांची सुसज्ज इमारत निर्माण करणे, अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, नवीन इमर्जन्सी ग्रीड ट्रान्सफार्मर बसविणे, ई.एस.आर. सिस्टीम बसविणे, ईटीपी व एसटीपी प्लांट बसविणे, लिनन वॉशिंग सेक्शन, भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषद दिल्लीच्या मानकानुसार बाह्यरुग्णांकरिता केंद्रीय नोंदणी कक्ष निर्माण करणे, रुग्णालयातील बाह्यरुग्ण स्वच्छतागृहासह दिव्यांगाकरिता स्वच्छतागृह निर्माण करणे, रुग्णालयात विविध प्रकारची यंत्रसामुग्री खरेदी करणे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या आवश्यक यंत्रसामुग्री तसेच फर्निचर खरेदी करणे आदींसह एकूण १६ विकासकामांचा प्रस्ताव दिला आहे. यात पहिल्या टप्प्यात पंचकर्म विभागाच्या विकासासाठी ३० लाखांच्या निधीला मंजुरी देण्यात आली. या निधीमधून रुग्णालयाच्या पहिल्या माळ्यावर अद्ययावत पंचकर्म विभाग तयार करण्यात येणार आहे. यामुळे रोज ५०० नागरिक पंचकर्म करू शकणार आहेत.
आता विकासकामाला गती
शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गणेश मुक्कावार म्हणाले, ‘डीपीडीसी’त आयुर्वेद रुग्णालयाचा समावेश झाल्याने आता खऱ्या अर्थाने विकासाला गती मिळणार आहे. रुग्णालयाच्या विकास कामाचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे सादर करण्यात आला आहे.