शासकीय आयुर्वेद महाविद्यालय : बीएएमएसच्या २५ टक्क्यांनी वाढल्या जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 01:20 AM2019-07-21T01:20:05+5:302019-07-21T01:21:21+5:30
वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएसच्या १० टक्क्याने जागा वाढल्या असताना आता आयुर्वेद महाविद्यालयातील ‘बीएएमएस’ या पदवीच्याा जागा २५ टक्क्याने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या पदवीच्या १०० वरून १२५ जागा होणार आहेत, तसे आयुष मंत्रालयाचे पत्र शनिवारी अधिष्ठात्यांना प्राप्त झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएसच्या १० टक्क्याने जागा वाढल्या असताना आता आयुर्वेद महाविद्यालयातील ‘बीएएमएस’ या पदवीच्याा जागा २५ टक्क्याने वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या पदवीच्या १०० वरून १२५ जागा होणार आहेत, तसे आयुष मंत्रालयाचे पत्र शनिवारी अधिष्ठात्यांना प्राप्त झाले.
विशेष म्हणजे, राज्यभरात चार शासकीय तर १८ खासगी शासकीय अनुदानित आयुर्वेद महाविद्यालये आहेत. एकूण २२ आयुर्वेद महाविद्यालयांना यावर्षीपासून २५ टक्के वाढीव जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे.
नागपुरातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाची स्थापना झाली तेव्हा केवळ पदवी अभ्यासक्रमाच्या २५ जागा होत्या. पुढे यात वाढ होऊन १०० जागा वाढल्या. नुकतेच राज्यातील खासगीसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना (ईडब्ल्यूएस) १० टक्के आरक्षण लागू करण्याकरिता ‘एमबीबीएस’च्या ९७० जागा वाढविण्यात आल्या. त्याच धर्तीवर ‘ईडब्ल्यूएस’साठी १० टक्के तर मराठा विद्यार्थ्यांसाठी १२ टक्के आरक्षण असे एकूण २२ टक्के आरक्षण आयुर्वेदाच्या ‘यूजी’ प्रवेशासाठी जाहीर करण्यात आले. केंद्र शासनाने जुन्या आरक्षणाला धक्का न लावता सरसकट २५ टक्के आरक्षण विद्यार्थ्यांच्या हितासाठी वाढवून दिले आहे.
सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीनने (सीसीआयएम) ५ जुलै २०१९ रोजी २५ टक्के जागा वाढविण्याचा निर्णय घेतला होता, तसे पत्र राज्य शासनाच्या आयुष मंत्रालयाला पाठविले होते. आयुष मंत्रालयाने १८ जुलैला यावर निर्णय घेतला. तसे पत्र शनिवार २० जुलै रोजी सर्व अधिष्ठात्यांना प्राप्त झाले. या पत्रात येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना फायदा होईल
शासनाच्या निर्णयानुसार ‘बीएएमएस’च्या २५ टक्के जागा वाढल्या आहेत. तसे पत्रच शनिवारी प्राप्त झाले. यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून १०० ऐवजी १२५ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. आर्थिकदृष्ट्या मागास व मराठा विद्यार्थ्यांनाही या निर्णयामुळे संधी मिळणार आहे. सोमवारपासून ही प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.
डॉ. गणेश मुक्कावार
अधिष्ठाता, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय