मुस्लीम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 11:28 AM2019-02-04T11:28:40+5:302019-02-04T11:29:09+5:30
केंद्र व राज्यातील सरकार मुस्लीम समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मूलभूत समस्यांवर विचार झाला तर त्या सोडविता येतात. विदर्भ मुस्लीम इंटलेक्चुअल फोरमने मुस्लीम समाजाच्या प्रश्नावर चर्चेसाठी पुढाकार घेतला आहे. यातून समाजहिताचे निर्णय होतील. परिषदेचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. केंद्र व राज्यातील सरकार मुस्लीम समाजाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी दिली. सदर येथील अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात विदर्भ मुस्लीम इंटलेक्चुअल फोरमच्यावतीने ‘मुस्लिमांच्या समस्या व समाधान’यावर आयोजित एकदिवसीय परिषदेत प्रमुख अतिथी म्हणून गडकरी बोलत होते. यावेळी फोरमचे अध्यक्ष डॉ. शकील सत्तार, झकात फाऊं डेशन, नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. सय्यद जफर महमूद, अॅड. फिरदोस मिर्झा प्रामुख्याने उपस्थित होते.
आम्ही कुठली जात-धर्म, भाषा, पंथाच्या नावावर भेदभाव करीत नाही. आपले विचार वेगवेगळे असू शकतात. परंतु यावर चर्चा झाली पाहिजे. एकमेकांना समजून घेतले पाहिजे. यासाठी सहकार्य, संवाद व समन्वयाची गरज आहे. मुस्लीम समाजातील मुलींना इंजिनिअर होता यावे, यासाठी अंजुमन संस्थेला अभियांत्रिकी दर्जा दिला. समाजात अशा स्वरूपाचे बदल होत आहेत. इंटलेक्चुअल फोरमच्या आवाहनामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिवर्तन होईल. कोणत्याही समाजाच्या प्रगतीची जबाबदारी ही सरकारची असते. परंतु यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले. एचसीएलसारख्या आयटी कंपन्यांमध्ये सर्व समुदायातील युवकांना नागपूरच्या मिहान प्रकल्पात रोजगार मिळत आहे. उज्ज्वला, पंतप्रधान आवास योजना या योजनांचा लाभ सर्वच समाजघटकांना मिळत आहे. यांत्रिक पद्धतीने संचालित इलेक्ट्रीक रिक्षा देशभरात परिवहन मंत्रालयाच्या पुढाकाराने चालवले जात आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
झकात फाऊं डेशन, नवी दिल्लीचे अध्यक्ष डॉ. सय्यद जफर महमूद यांनी मुस्लिमांचे शासनाप्रति असलेले प्रश्न यावर बोलताना मुस्लिमांचे संसदेतील प्रतिनिधित्व, वक्फ बोर्डच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नेमणुकासाठी भारतीय वक्फ सेवेचे गठन, शैक्षणिक संस्थांचा अल्पसंख्याक दर्जा व सच्चर आयोगाच्या शिफारशींवर यावेळी प्रकाश टाकला. परिषदेत विदर्भातील मुस्लीम समाजातील उच्चशिक्षित, बुद्धिजीवी, फोरमचे पदाधिकारी, विदर्भातून आलेले मुस्लीम विचारवंत, अंजुमन अभियांत्रिकी महाविद्यालयाचे शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते.
नोकरी मागण्यापेक्षा देणारे व्हा
विकासाचा संबंध हा कुठल्याही राजनैतिक व धार्मिक भावनेशी निगडित नसून तो गुणवत्तेला प्राधान्य देतो व या गुणवत्तेची क्षमतावृद्धी करणे गरजेचे असते. आरोग्य, निवारा, पिण्याचे पाणी, चांगल्या शैक्षणिक सुविधा भावी पिढीसाठी महत्त्वाच्या आहेत. समाजात किती प्रशासकीय अधिकारी, डॉक्टर्स, अभियंते निर्माण झाले यापेक्षा किती उद्योजक निर्माण झाले, हे पाहणे महत्त्वाचे आहे. रोजगार मागणाऱ्यांपेक्षा रोजगार देणारे अशी मानसिकता अंगिकारणे महत्त्वाचे आहे, असे गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.
समाजाला नवी दिशा मिळेल
कोणत्याही समाजाचा विकास शिक्षण घेतल्याशिवाय शक्य नाही. मुस्लीम समाजात शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. उच्च शिक्षणासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने जागरूक होण्याची गरज आहे. मुस्लीम इंटलेक्चुअल फोरमने मुस्लीम समाजाची समस्या मांडली. एक जबाबदार राजकारणी म्हणून मुस्लीम समाजाचे प्रश्न व समस्या गांभीर्याने घेतल्या आहेत. त्या सोडविण्यासाठी स्वत: तसेच पक्षपातळीवर विचार करू. परिषदेच्या माध्यमातून होणाºया चर्चेतून समाजाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.