विरोधकांचे मनोबल तोडण्याचे सरकारचे षड्यंत्र : प्रकाश आंबेडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2019 08:04 PM2019-02-09T20:04:37+5:302019-02-09T20:05:54+5:30
भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीवर आरोप केला की, मोदी सरकार आरएसएसचा छुपा अजेंडा राबवित आहे. त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकार आपल्या विरोधकांचे मनोबल तोडण्याचे षड्यंत्र करीत आहे. विरोधकांच्या जवळच्यांना फसविण्यासाठी पोलिसांचा वापर केला जात आहे. शनिवारी रविभवनमध्ये आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीवर आरोप केला की, मोदी सरकार आरएसएसचा छुपा अजेंडा राबवित आहे. त्याचबरोबर केंद्र व राज्य सरकार आपल्या विरोधकांचे मनोबल तोडण्याचे षड्यंत्र करीत आहे. विरोधकांच्या जवळच्यांना फसविण्यासाठी पोलिसांचा वापर केला जात आहे.
शनिवारी रविभवनमध्ये आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी ते आनंद तेलतुंबडे यांच्या प्रकरणाबद्दल बोलताना म्हणाले की, एल्गार परिषदेचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे भासवून परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अटक करण्यात येत आहे. एल्गार परिषदेने मराठा-ओबीसी वाद मिटविण्यासाठी प्रमुख भूमिका निभावली होती. सरकारला हे होऊ द्यायचे नव्हते. त्यामुळे सरकारने एल्गार परिषदेला नक्षलवादी संघटनांकडून आर्थिक मदत मिळत असल्याचा आरोप लावून पोलिसांकडून चौकशी सुरू केली आहे. पुणे ग्रामीण पोलीस कोरेगाव-भीमा दंगलीत संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांच्यावरील आरोपासंदर्भात प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले आहे. पुणे शहर पोलिसांनी एल्गार परिषदेच्या लोकांना दंगलीसाठी जबाबदार धरले आहे. अॅड. आंबेडकर म्हणाले की, अमेरिके तील अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिसने ‘ऑर्डर ऑफ व्हायलन्स’ या विषयावर परिषदेचे आयोजन केले होते. यावर विचार मांडण्यासाठी प्राध्यापक लीजा लिंकन यांनी मुंबईचे डॉ. आनंद तेलतुंबडे यांना निमंत्रण पाठविले होते. तेथून आल्यानंतर डॉ. आनंद तेलतुंबडे यांना मुंबई पोलिसांनी अटक केली. त्यानंतर पोलिसांनी एफआयआरमध्ये आरोपीचे नाव आनंद असा उल्लेख केला आहे. पण हा आनंद कोण आहे, याचा स्पष्ट उल्लेख यात नाही.
एवढेच नाही, तर पोलिसांनी एफआयआरमध्ये आनंद यांना आमंत्रित करणाऱ्या अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस ला सेंटर ऑफ टेररिझम घोषित केले आहे. त्यामुळे भारत सरकारचे अमेरिका व फ्रान्सशी संबंध बिघडू शकतात. या प्रकरणात फसविण्यात आलेल्या सर्वानी जमानतीसाठी उच्च न्यायालयात अपील केले आहे. आंबेडकर म्हणाले की, न्यायालयाला आमची विनंती आहे की, पोलिसांकडून न्यायालयात सादर करण्यात येणाऱ्या दस्तावेजाची सर्व वकीलांसमोर बारकाईने तपास होणे गरजेचे आहे. पत्रपरिषदेत प्रदेश महासचिव गुणवंत देवपारे, सागर डबरासे, शहर अध्यक्ष रवि शेंडे, जिल्हाध्यक्ष नितेश जंगले आदी उपस्थित होते.
काँग्रेसने आधी आरएसएस संदर्भात अजेंडा सांगावा
काँग्रेससोबत आघाडीसंदर्भात बोलताना अॅड. आंबेडकर म्हणाले की, काँग्रेस जर सरकारमध्ये आल्यास, त्यांचा आरएसएसला संवैधानिक चौकटीत बसविण्यासाठी काय अजेंडा राहील, याची विचारणा केली आहे. पण काँग्रेस अजेंडा देत नाही. अजेंडा सांगितल्यानंतरच काँग्रेससोबत आघाडीचा विचार होईल. तसे भारिप महाराष्ट्रात ४८ जागांवर निवडणुक लढण्याची तयारी करीत आहे. मी सुद्धा निवडणूक लढणार आहे, पण अजूनही मतदारसंघ निश्चित केलेला नाही.
राफेलवर पंतप्रधानांनी खुलासा करावा
राफेल प्रकरणात अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, पंतप्रधानांनी यावर खुलासा करणे गरजेचे आहे. काँग्रेस व भाजपाच्या राफेल खरेदीत किमान ७०० बिलियन डॉलरचे अंतर आहे. सोबतच राफेल विमानाच्या दुरुस्तीची गॅरंटी कोण घेणार? वायुसेनेला १०० हून अधिक राफेल विमानाची गरज असताना फक्त ३६ विमान का खरेदी करण्यात आले, यावर पंतप्रधानांनी बोलले पाहिजे.