कौशल्य विकास प्रकल्पाला सरकारचे सहकार्य
By admin | Published: February 29, 2016 02:59 AM2016-02-29T02:59:12+5:302016-02-29T02:59:12+5:30
माळी समाज उद्योजक प्रदर्शन संमेलनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र येण्यासाठी नवे व्यासपीठ मिळाले.
मुख्यमंत्र्यांची ग्वाही : माळी समाज उद्योजक प्रदर्शन व संमेलनाचा समारोप
नागपूर : माळी समाज उद्योजक प्रदर्शन संमेलनाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र येण्यासाठी नवे व्यासपीठ मिळाले. यातूनच स्थापन झालेल्या महात्मा फुले इंडस्ट्रीयल चेंबर आॅफ कॉमर्स इंडियाच्या माध्यमातून समाजातील युवकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी कौशल्य विकासाचा उपक्रम राबवा. या उपक्रमाला राज्य सरकारकडून सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिली.
मानेवाडा -बेसा रोड येथील संत सावता महाराज सांस्कृतिक लॉन येथे आयोजित उद्योजक क्रांती २०१६, माळी समाज उद्योजक क्रांती प्रदर्शन व संमेलनाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार कृपाल तुमाने, भाजपचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, नागो गाणार, माजी आमदार अशोक मानकर, भाजपचे जिल्हा अध्यक्ष डॉ. राजीव पोतदार, कार्यक्रमाचे संयोजक अविनाश ठाकरे, उद्योजक शंकरराव बोरकर, डी.बी.महाजन, रंजन गिरमे, विश्वास महादुरे आदी उपस्थित होेते.
महात्मा जोतीबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी विपरीत परिस्थितीवर मात करून समाजकार्य केले. त्यांनी समाजालाच नाही तर देशाला आत्मविश्वास आणि आत्मसन्मान दिला. त्यांच्या नावाने महात्मा फुले इंडस्ट्रीयल चेंबर आॅफ कॉमर्स इंडिया या उद्योग व्यासपीठाची स्थापना करण्यात आली आहे. ही गौरवास्पद बाब आहे. समाजातील तरुणांना उद्योगाप्रति एक वेगळी दिशा देण्याचे कार्य उद्योजकांनी करावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले. यावेळी समाजातील मान्यवरांचा फडणवीस व गडकरी यांच्याहस्ते सन्मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला. (प्रतिनिधी)
५ लाख कोटींची विकास कामे
गेल्या २० महिन्यात केंद्र सरकारच्या माध्यमातून १.५ लाख कोटींची रस्त्यांची कामे करण्यात आली. पुढील दोन वर्षात ५ लाख कोटींची कामे करण्यात येणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली. उद्यमशीलतेतून समाज उन्नत होतो. महात्मा फुले इंडस्ट्रीयल चेंबर आॅफ कॉमर्स इंडिया माध्यमातून अनेकांना मदत होईल. अविनाश ठाकरे यांचा हा उपक्रम स्तुत्य आहे. नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे बना. अशी प्रेरणा या उद्योजक क्रांती मेळाव्याच्या माध्यमातून घ्यावी. असे आवाहन करून गडकरी यांनी चेंबर आॅफ कॉमर्स इंडियाच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
विविध उद्योगांचे १२० स्टॉल
माळी समाज उद्योजक क्रांती प्रदर्शनात १२० उद्योजकांनी स्टॉल लावले. यात कृषी साहित्य, मरिन, गृहोपयोगी साहित्य, पुस्तक व साहित्य प्रकाशन अशा विविध क्षेत्रातील राज्यातील उद्योजक सहभागी झाले होते. माळीनगर येथील सहकारी साखर कारखाना, केसरी टुर्स अॅन्ड ट्रॅव्हल्स, आॅटोमोबाईल इंडस्ट्रीज, नागोबा इंडस्ट्रीज, स्वीप ट्रेडर इंडस्ट्रीज, यासह शासनाच्या विविध विभागांनी कौशल्य विकास, उद्योग, अर्थसाहाय्य विषयक माहिती देणारे स्टॉल लावले होते. तीन दिवसात हजारो युवकांनी व इच्छुकांनी याचा लाभ घेतल्याची माहिती अविनाश ठाकरे यांनी प्रस्ताविकातून दिली.
मरणोत्तर उद्योजक पुरस्कार
राजाराम शिवराम निर्वाण, तात्यासाहेब ऊर्फ गं.वि.हिवसे, सदाशिवराव महादुरे, महादेवराव मानकर आदींना मरणोत्तर उद्योजक पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यांच्या नातेवाईंनी मान्यवरांच्या हस्ते ते स्वीकारले. तसेच लाईफटाईम अचिव्हमेंट उद्योजक पुरस्कार, महिला उद्योजक पुरस्कार व यंग अचिव्हर उद्योजक पुरस्काराचे वितरण करण्यात आले.