जिल्ह्यात शासकीय कापूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:36 AM2020-12-17T04:36:14+5:302020-12-17T04:36:14+5:30
रामटेक : शेतकऱ्यांचा कापूस घरी पोहोचला असला तरी जिल्ह्यातील बहुतांश भागात अद्यापही शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नाही. ...
रामटेक : शेतकऱ्यांचा कापूस घरी पोहोचला असला तरी जिल्ह्यातील बहुतांश भागात अद्यापही शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले नाही. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने उपाययोजना कराव्या, अशी मागणी रामटेक परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना पारशिवनीच्या तहसीलदार यांच्यामार्फत भाजपच्या ग्रामविकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजेश ठाकरे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आली. यासोबत रामटेक तालुक्यात धान खरेदी केंद्राची संख्या आणि आणि खरेदी क्षमता वाढविण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. हमीभावापेक्षा कमी दरामध्ये कापूस खरेदी करणाऱ्या खासगी व्यापाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि जिल्ह्यातील सर्व खासगी जिनिंग मिलमध्ये सरकारी ग्रेडर लावून कापूस खरेदी करण्यात यावा. पारशिवनी तालुक्यातील पूरग्रस्तांना तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यातील पूरग्रस्तांना अद्यापही शासकीय मदत मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात अतुल हजारे, लक्ष्मण केने,शंकर चहांदे, कमलाकर मेंघर, रामभाऊ दिवटे, अशोक कुथे, जयराम मेहरकुळे, प्रतीक वैद्य,अमोल साकोरे, मनोज गिरी,आशिष उरले, अनिल वांडे, अर्शद शेख, देवीदास दिवटे यांचा समावेश होता.