भगवद् गीतेचं वाटप सरकारने केलं नाही- विनोद तावडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 12:32 PM2018-07-12T12:32:11+5:302018-07-12T14:08:32+5:30
विरोधकांनी भगवद् गीतेवर केलेली ओरड दिशाभूल करणारी असून हे वाटप सरकारने केलं नसल्याचे स्पष्टीकरण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केले.
नागपूर - मुंबईतील महाविद्यालयांमध्ये भगवद् गीतेचं वाटप करण्याच्या उच्च शिक्षण विभागाच्या निर्णयानंतर विरोधक आक्रमक झाले आहेत. यावर शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. विरोधकांनी भगवद् गीतेवर केलेली ओरड दिशाभूल करणारी असून हे वाटप सरकारने केलं नसल्याचे स्पष्टीकरण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना केले. पुढे विनोद तावडे असंही म्हणाले की, भगवत् गीतेच्या प्रतींचे वाटप महाविद्यालयांना केल्याबाबत काँग्रेस-राष्ट्रवादी, समाजवादी पक्षांनी गरळ ओकली होती. सरकार भगवद् गीतेचे वाटप करून शालेय जीवनापासून धर्मामध्ये तेढ निर्माण करीत आहे ही ओरड चुकीची आहे.
सरकारने भगवद् गीता वाटली नाही. सरकार कधीच धर्मग्रंथ वाटत नाही. भक्तीवेदांत ट्रस्ट या संस्थेने माझ्याकडे भगवद् गीता वाटपाच्या संदर्भात विचारणा केली होती. आम्ही स्पष्ट सांगितले, सरकार भगवद् गीता खरेदी करत नाही, तुम्हाला वाटायच्या असतील तर महाविद्यालयांची यादी आपल्याला मिळेल. आम्ही त्यांना यादी दिली आणि त्यांनी ते मोफत वाटप केले होते असा खुलासा तावडे यांनी केला. भगवत् गीतेच्या काही प्रती संचालक कार्यालयामध्येही ठेवल्या. संचालकांनी महाविद्यालयांना त्या प्रती घेऊन जाण्यासंदर्भात पत्र पाठवले होते अशी जोड त्यांनी पुढे दिली.