सरकार खासगी डॉक्टरांना विश्वासात घेत नाही : विनय अग्रवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 01:15 AM2018-10-21T01:15:13+5:302018-10-21T01:17:05+5:30
सरकारचे आरोग्य कार्यक्रम, योजना चांगल्या असतात. परंतु त्याची व्यापक अंमलबजावणी होत नाही. कारण, सरकार खासगी डॉक्टरांना विश्वासातच घेत नाही. आयुष्यमान भारत सारख्या योजनेत खासगी रुग्णालयांचा समावेश फारच कमी आहे. योजनेच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी खासगी डॉक्टर व व्यवसायिकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे, असे मत ‘आयएमए’चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनय अग्रवाल यांनी येथे व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सरकारचे आरोग्य कार्यक्रम, योजना चांगल्या असतात. परंतु त्याची व्यापक अंमलबजावणी होत नाही. कारण, सरकार खासगी डॉक्टरांना विश्वासातच घेत नाही. आयुष्यमान भारत सारख्या योजनेत खासगी रुग्णालयांचा समावेश फारच कमी आहे. योजनेच्या चांगल्या अंमलबजावणीसाठी खासगी डॉक्टर व व्यवसायिकांना विश्वासात घेणे आवश्यक आहे, असे मत ‘आयएमए’चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. विनय अग्रवाल यांनी येथे व्यक्त केले.
इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नागपूर शाखेच्यावतीने ‘निमॅकॉन-२०१८’ परिषदेत शनिवारी डॉ. किशोर टावरी स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यात ‘वैद्यकीय सामाजिक परिस्थिती’ या विषयावर ते बोलत होते. या चर्चासत्रात डॉ. वेदप्रकाश मिश्रा व डॉ. आरती आनंद यांनी विशेष अभिप्राय सादर केला.
डॉ. अग्रवाल म्हणाले, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताच्या वैद्यकीय सामाजिक परिस्थितीत फार बदल झाला आहे. त्यावेळी भारतीय माणसाचे सरासरी वय ३२ होते. ते आता ६८ वर पोहचले आहे. हे केवळ बदलत्या वैद्यकीय परिस्थितीचे द्योतक आहे.
परिषदेच्या पहिल्या दिवशी अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी आधुनिक उपचार पद्धतींच्या आश्चर्यजनक प्रगतीचा आलेख सादर केला. अत्याधुनिक लॅप्रोस्कोपी सर्जरीपासून, मधुमेहासारख्या आजारांच्या उपचारांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. चर्चासत्राची सुरुवात प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ. अजय कडुस्कर यांच्या व्याख्यानाने झाली. डॉ. आश्विनी तायडे,डॉ. गोपाल अरोरा, डॉ. अलंकार रामटेके, डॉ. आलोक उमरे, डॉ. मिलिंद भुशुंडी, डॉ. ईश्वर गिलाडा, डॉ. प्रशांत भांडारकर, डॉ. संजय देशपांडे, डॉ. नंदिनी गोकुलचंद्रन, डॉ. सुरेश चावरे व डॉ. राजेश सिंघानिया आदींचे अतिशय अभ्यासपूर्ण असे व्याख्यान झाले. दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्थेचे डॉ. ललित वाघमारे यांनी वैद्यकीय शिक्षण तंत्रामध्ये आमूलाग्र बदल होत असून ते आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले. डॉ. रवि वानखेडे यांनी अवयवदान या विषयी जनजागरणाची आवश्यकता प्रतिपादित केली. डॉ. अजय काटे यांनी शस्त्रक्रियेनंतर घ्यायच्या काळजीबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. आशिष दिसावल, सचिव डॉ. दिनेश अग्रवाल, आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. अभिजित अंभईकर, सचिव डॉ. सरिता उगेमुगे, आयएमए महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. यशवंत देशपांडे, उपाध्यक्ष डॉ. संजय देशपांडे व डॉ. विंकी रुघवानी उपस्थित होते.