राष्ट्रसंतांच्या तसबिरीसाठी शासनाकडे जागाच नाही?

By Admin | Published: February 10, 2016 03:23 AM2016-02-10T03:23:48+5:302016-02-10T03:23:48+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे विदर्भातले संत. पण विदर्भाच्या अनुशेषासह विदर्भातल्या संतांकडेही दुर्लक्ष करून .....

Government does not have any place for national events? | राष्ट्रसंतांच्या तसबिरीसाठी शासनाकडे जागाच नाही?

राष्ट्रसंतांच्या तसबिरीसाठी शासनाकडे जागाच नाही?

googlenewsNext

गुरुदेव भक्तांमध्ये संतापाची लाट : अधिकृत स्वातंत्र्य लढ्यातही महाराजांचे नाव नाही
राजेश पाणूरकर नागपूर
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणजे विदर्भातले संत. पण विदर्भाच्या अनुशेषासह विदर्भातल्या संतांकडेही दुर्लक्ष करून त्यांची उपेक्षा करण्याचे काम सरकार करीत आहे. राष्ट्रसंतांनी समाजाच्या प्रबोधनासह भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातही सक्रिय सहभाग नोंदविला. चिमूरचा सत्याग्रह आणि क्रांती तर सर्वविदितच आहे. याशिवाय महाराजांनी महात्मा गांधी यांच्यासह स्वातंत्र्यलढ्यात सहभाग दिलेला आहे. राष्ट्रपुरुषांच्या यादीत राष्ट्रसंतांचे नाव समाविष्ट करावे म्हणून अ. भा. गुरुदेव सेवा मंडळाच्यावतीने अनेकदा निवेदने देण्यात आली. सातत्याने पाठपुरावा केल्यावर राज्य शासनाने राष्ट्रसंतांच्या राष्ट्रीय कार्याची माहिती मागविली. ती पाठविल्यावर मात्र शासनाने दिलेले अजब उत्तर राष्ट्रसंतांच्या भक्तांना संताप आणणारे आहे.
राष्ट्रसंतांचे राष्ट्रीय कार्य शासनाला कळविल्यानंतर शासकीय कार्यालयात थोर राष्ट्रपुरुषांच्या छायाचित्रांच्या यादीत राष्ट्रसंतांचे छायाचित्र लावता येणार नाही, असे गुरुकुंज आश्रमाला कळविले आहे. शासकीय कार्यालयात थोर राष्ट्रपुरुषांचे छायाचित्र लावण्याचे आदेश शासनाने २८ राष्ट्रपुरुषांसाठी दिले आहेत. ही संख्या पाहता त्यात अधिक वाढ करता येणे शक्य नाही. राष्ट्रसंतांचे छायाचित्र लावण्यासाठी शासकीय कार्यालयात जागा उपलब्ध नसल्याचे पत्रच शासनाने गुरुकुंज आश्रमाला पाठविले आहे. राष्ट्रसंतांनी सातत्याने समाजासाठी कार्य केले. प्रामुख्याने त्यांचे कार्यक्षेत्र विदर्भ राहिले. ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रबोधन करून ग्रामीण भाग स्वयंपूर्ण होण्यासाठी त्यांनी प्रबोधन केले. एकूणच मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी आणि माणसाला शिस्त लावण्यासाठी जाचक रुढींवर त्यांनी प्रहार केला आणि निसर्गाला अनुरूप जीवनशैलीचा प्रसार केला. महाराजांच्या उपदेशांच्या प्रभावाने ग्रामीण भागातील अनेक युवक आजही व्यसनमुक्त होत आहेत. पण शासन स्तरावर मात्र त्यांची उपेक्षाच होते आहे. विधानभवनात राष्ट्रसंतांना आदरांजली द्यावी आणि त्यांची तसबीर शासकीय कार्यालयात लावावी, अशी मागणी गुरुदेव भक्तांची आहे. पण शासकीय कार्यालयात राष्ट्रसंतांसाठी आता जागा उपलब्ध नाही, असे उत्तर शासनाकडून देण्यात आल्याने गुरुदेव भक्तांमध्ये संतापाची भावना आहे. जपानला विश्व धर्म संमेलनात महाराजांनी भारताचे प्रतिनिधित्व केले. ग्रामगीतेतून त्यांनी खेडी स्वयंपूर्ण केलीत. माजी मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार महाराजांचे भक्त होते. पण राष्ट्रसंतांचे राष्ट्रीय कार्य शासनातर्फे अमान्य होते आहे. यासंदर्भात पालकंमंत्री, मुख्यमंत्री यांना निवेदने देण्यात आली पण त्याचा उपयोग नाही, अशी माहिती अ. भा. गुरुदेव सेवा मंडळाचे राष्ट्रीय प्रचार प्रमुख बबनराव वानखेडे यांनी दिली. (प्रतिनिधी)

गुरुदेव भक्तांच्या संतापाच्या उद्रेकाची प्रतीक्षा नको
राष्ट्रसंतांचे नाव राष्ट्रपुरुषांच्या यादीत नाही आणि त्याचे छायाचित्र लावण्यासाठी शासकीय कार्यालयात जागा नाही. याशिवाय केंद्र शासनाने गुरुकुंज आश्रमाची सहा फूट जागा रस्त्यासाठी मागितली. पण शासनाने रस्त्यासाठी आश्रमाच्या आत ६१ फुटांवर खूण करून ठेवली आहे. येथे महाराजांची समाधी आहे. समाधीस्थळी महाराजांनी बेल, आवळा, उंबर, वड आणि पिंपळ असे पाच वृक्ष लावले. त्यानंतर महाराजांनी एक महिन्याने या जगाचा निरोप घेतला. या स्थळी आपली समाधी असावी, हे त्यांनी प्रथमच सांगून ठेवले त्याप्रमाणे येथे समाधी आहे. शासनाने केलेल्या मार्किंगप्रमाणे संपूर्ण समाधीच रस्त्याच्या कामात उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. शासनाने थोडी जागा सोडून बाजूने रस्ता केला तरी समाधीचे पावित्र्य आणि शांततेचा भंग होतो. त्यामुळे शासनाने समाधीची जागा वगळून दुरून रस्ता काढावा, अशी मागणी आहे. अन्यथा गुरुदेव भक्तांच्या उद्रेकाची प्रतीक्षा पाहू नका. हीच गुरुदेवभक्तांची भावना आहे.
- बबनराव वानखेडे
राष्ट्रीय प्रचारप्रमुख, अ. भा. गुरुदेव सेवा मंडळ, गुरुकुंज आश्रम.

Web Title: Government does not have any place for national events?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.