शासकीय कर्मचाऱ्यांची सर्व्हिस बुक होणार आॅनलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 09:03 PM2018-04-24T21:03:47+5:302018-04-24T21:04:02+5:30
शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपासून निवृत्तीपर्यंत सगळी माहिती ठेवणारे सर्व्हिस बुक आॅनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कर्मचाऱ्यांची सर्व माहिती आता आॅनलाईन सेव्ह राहणार असून, सुटीचा अर्ज सुद्धा कर्मचाऱ्यांना आॅनलाईन टाकावा लागणार आहे. या योजनेचा शुभारंभ नागपूर जिल्हा परिषदेतून होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपासून निवृत्तीपर्यंत सगळी माहिती ठेवणारे सर्व्हिस बुक आॅनलाईन करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कर्मचाऱ्यांची सर्व माहिती आता आॅनलाईन सेव्ह राहणार असून, सुटीचा अर्ज सुद्धा कर्मचाऱ्यांना आॅनलाईन टाकावा लागणार आहे. या योजनेचा शुभारंभ नागपूर जिल्हा परिषदेतून होणार आहे.
ग्राम विकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांनी सोमवारी नागपूर जिल्हा परिषदेला भेट दिली. या भेटीदरम्यान गुप्ता यांनी विविध विषयांसोबतच या प्रणालीचा आढावा घेतला. हा प्रकल्प अंतिम टप्प्यात असून काही दिवसातच या प्रणालीचे उद्घाटन सुद्धा होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या प्रणालीमुळे कर्मचाऱ्यांच्या सेवेचा रेकॉर्ड एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.
केंद्र व राज्य सरकारने ई-गव्हर्नन्सवर भर देण्यासाठी अनेक प्रणाली आॅनलाईन केल्या आहेत. यात निविदा प्रक्रियेपासून सेवार्थ प्रणालीपर्यंत सगळ्या प्रणाली आॅनलाईन केल्या जात आहे. आता सर्व्हिस बुकसुद्धा आॅनलाईन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कारण कर्मचाऱ्यांच्या ३० ते ३५ वर्षांच्या सेवेदरम्यान सर्व्हिस बुकची दैना होते. जुन्या पोथ्यांसारखी दिसणारे हे सर्व्हिस बुक कधी कधी गहाळ सुद्धा होते. यावर उपाय म्हणून सरकारने आता हे सर्व्हिस बुक आॅनलाईन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सगळी माहिती आता आॅनलाईन सेव्ह राहणार आहे.