जुन्या पेन्शनसाठी दाखविली शासकीय कर्मचाऱ्यांनी शक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 08:28 PM2019-09-09T20:28:20+5:302019-09-09T20:33:38+5:30

जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय, शिक्षक शिक्षकेत्तर समन्वय समितीच्यावतीने सोमवारी लाक्षणिक संप पुकारला होता.

Government employees Shown Power for old pension | जुन्या पेन्शनसाठी दाखविली शासकीय कर्मचाऱ्यांनी शक्ती

जुन्या पेन्शनसाठी दाखविली शासकीय कर्मचाऱ्यांनी शक्ती

Next
ठळक मुद्देसंविधान चौकात केला लाक्षणिक संपजिल्हा परिषदेच्या शिक्षक व कर्मचाऱ्यांचा भरभरून प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जुनी पेन्शन लागू करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय, शिक्षक शिक्षकेत्तर समन्वय समितीच्यावतीने सोमवारी लाक्षणिक संप पुकारला होता. या संपात शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या एकजुटीचा परिचय देत, कर्मचाऱ्यांची एकता दाखवून दिली. कुणाचेही नेतृत्व न स्वीकारता संघटनांनी दाखविलेला समन्वय या संपाच्या माध्यमातून दिसून आला. संविधान चौकात संपकऱ्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेशी संलग्नित सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांसह शिक्षकांनी भरभरून संपाला प्रतिसाद दिला.
या संपामुळे जिल्ह्यातील बहुतांश शासकीय कार्यालयाची कामे खोळंबली होती. जिल्हा परिषदेचे व खासगी अनुदानित शाळेचे शिक्षकही संपात सहभागी असल्याने शाळा बंद होत्या. जुनी पेन्शन योजना लागू करावी, सर्व संवर्गातील वेतन त्रुटी दूर कराव्यात, खासगीकरण व कंत्राटीकरणाचे धोरण रद्द करावे, केंद्राप्रमाणे सर्व वेतन भत्ते मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी हा संप पुकारला होता. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी या मागण्या पूर्ण व्हाव्यात म्हणून समन्वय समितीच्या माध्यमातून ५ सप्टेंबरपासून काळ्या फिती लावून काम सुरू आहे. सोमवारी लाक्षणिक संप यशस्वी करून ११ सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा समन्वय समितीने दिला.
जिल्हा परिषदमध्ये शुकशुकाट
या लाक्षणिक संपामध्ये मोठ्या संख्येने जिल्हा परिषदेचे कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी जि.प.मुख्यालयातील प्रत्येक विभागात शुकशुकाट होता. कर्मचारी संघटनांनी संपासाठी प्रत्येक विभाग प्रमुखासह सीईओंनासुद्धा लेखी सूचना केल्या होत्या. त्यामुळे सोमवारी विभाग प्रमुख यांच्यासह बोटावर मोजण्याइतके कर्मचारी सोडल्यास संपूर्ण कार्यालयात शुकशुकाट होता.
जि.प.च्या शाळा बंद
संपामध्ये सर्वाधिक सक्रिय असणारा वर्ग शिक्षकांचा होता. जि.प.मध्ये असणाऱ्या  शिक्षकांच्या विविध संघटनांनी संपात सहभाग घेतला होता. शिक्षकांनी मुख्यालयातील शिक्षण अधिकारी, पं.स.वर गटशिक्षण अधिकाऱ्याला संपासाठी लेखी सूचना दिल्या होत्या. शिक्षकांनी शाळा बंद ठेवून संपात सहभाग घेतला होता. शिक्षकांच्या सक्रिय सहभागीमुळे संप खऱ्या अर्थाने यशस्वी ठरला.
या संघटनांचा होता सहभाग
म.रा. शिक्षक परिषद, शिक्षक भारती, विज्युक्टा, विदर्भ शिक्षक संघटना, म.रा. शिक्षक संघ, म.रा. शिक्षक समिती, म.रा. शिक्षक सेना, म.रा. शिक्षक व शिक्षकेत्तर नवनिर्माण सेना, अ.भा. प्रा. शिक्षक संघ, म.रा. मागासवर्गीय शिक्षक संघटना, म.रा. कास्ट्राईब शिक्षक संघटना, म.रा. पुरोगामी शिक्षक समिती, म.रा. प्रा. शिक्षक पदवीधर केंद्रप्रमुख सभा, काँग्रेस शिक्षक सेल, जि.प. केंद्रप्रमुख संघ, नागपूर जिल्हा मुख्याध्यापक संघ, राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक संघ, म.रा. शिक्षण संस्था महामंडळ, म.रा. शारीरिक शिक्षण व शिक्षक महासंघ, बहुजन शिक्षक महासंघ, प्रहार शिक्षक संघटना, म.रा. जुनी पेन्शन हक्क संघटना, पेन्शन बचाव कृती समिती, ग्रामसेवक संघटना, जि.प. कर्मचारी महासंघ, म.रा. जि.प. कर्मचारी युनियन, म.रा. शासकीय व निमशासकीय लिपिक हक्क परिषद, म.रा. जि.प. लेखा कर्मचारी संघटना, म.रा. जि.प. लिपिकवर्गीय संघटना, म.रा. जि.प. आरोग्य सेवा कर्मचारी संघटना, म.रा. कृषी विभाग, शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना, म.आरोग्य प्रशासकीय कर्मचारी संघटना, जलसंपदा विभाग कर्मचारी संघटना, कृषी विभाग लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना, वसंतराव नाईक अधिकारी कर्मचारी संघटना, सार्वजनिक बांधकाम व पाटबंधारे कर्मचारी संघटना, म.रा. कृषी सहायक संघटना, म.रा. कास्ट्राईब कर्मचारी संघटना

Web Title: Government employees Shown Power for old pension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.