कामगार केसरींच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष; शासन असो वा प्रशासन, राजकीय पक्षांनाही महापुरुषांचे विस्मरण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2022 11:17 AM2022-03-29T11:17:26+5:302022-03-29T11:32:07+5:30

स्वातंत्र्याच्या आंदोलनात महत्त्वाची भूूमिका बजावत असतानाच, त्यांनी उचललेली चळवळीची मशाल कामगारवर्गाच्या उत्थानासाठी महत्त्वाची मानली जाते. कामगार संघटनांचे उद्गाते म्हणूनच त्यांची अवघ्या भारतभरात ओळख आहे.

government forget about the founder of trade unions rambhau ruikar | कामगार केसरींच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष; शासन असो वा प्रशासन, राजकीय पक्षांनाही महापुरुषांचे विस्मरण!

कामगार केसरींच्या पुतळ्याकडे दुर्लक्ष; शासन असो वा प्रशासन, राजकीय पक्षांनाही महापुरुषांचे विस्मरण!

googlenewsNext
ठळक मुद्देआज ६८ वी पुण्यतिथी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापुरुषांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या साजऱ्या कराव्या आणि इतर दिवशी बोंबाबोंब, अशी सध्याची स्थिती आहे. स्वातंत्र्यसंग्राम सैनिक कामगार केसरी रामभाऊ रुईकरांच्या बाबतीत तर तेही नशिबी नाही. सामान्य माणसांना विस्मरणाचा आजारच जडलेला. परंतु, शासन-प्रशासन व देशाची सत्ता अनेक वर्ष सांभाळलेल्या राजकीय पक्षालाही किमान त्यांच्या जयंती-पुण्यतिथीचे स्मरण असू नये, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना, ही बाब प्रकर्षाने जाणवते. २७ मार्च रोजी या नि:स्पृह राजकीय व्यक्तिमत्त्वाचा ६८ वा पुण्यस्मरण दिन. मात्र, त्यांचा पुतळा नागपुरात उभा आहे, ही जाणीवच कुणाला नाही. कामगारांना सशक्त करण्याचा नारा देत असतानाचा पूर्णाकृती पुतळा उभा आहे. मात्र, या पुतळ्याची ओळख मिटली आहे. जिथे पुतळ्याची ओळख मिटली असेल तिथे त्यांच्या कर्तृत्वाचा जागर तरी कसा होईल?.

सहा महिन्यांपूर्वी या भागातील रस्त्याचे काम करताना पुतळ्यापुढचा ओटा फोडला गेला. रस्ता पूर्ण झाल्यावरही तो दुरुस्त झालेला नाही. पुतळ्यापुढे मातीचा ढिगारा पडून आहे. एवढेच कमी होते म्हणून की काय, पुतळ्याच्या हातावरून केबलची वायर गेलेली स्पष्टपणे दिसून येते. शिवाय, हा पुतळा कुणाचा आहे याचे उत्तर देणारा साधा नामफलकही येथे आतापर्यंत दिसत नव्हता. तो मागच्या बाजूला टांगलेला होता. आत्ता तो दिसेल अशा ठिकाणी लावलेला आहे. या रस्त्याला रुईकर रोड असे नाव आहे. मात्र, संपूर्ण रस्त्यावर रस्त्याच्या नावाचे नामफलक दिसत नाहीत. गेल्या कित्येक दिवसांपासून पुतळ्याची स्वच्छताही करण्यात आली नव्हती.

रामभाऊ रुईकरांचे कर्तृत्व

रामभाऊ रुईकर हे स्वातंत्र्यसंग्राम सैनिक होते. १९३०, १९३२ व १९४२ ते १९४५ या स्वातंत्र्याच्या आंदोलन काळात ते तुरुंगात होते. सुभाषचंद्र बोस यांच्यासोबतही त्यांनी काम केले. रामभाऊ हिदायततुल्ला यांच्यासोबत नागपूर हायकोर्टात वकिली करत. हिदायतुल्ला नंतर उपराष्ट्रपती झाले. सरदार पटेल यांनी रामभाऊंना तत्कालीन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रिपदही देऊ केले. परंतु, कामगारांच्या सेवेचे कारण देऊन ते पद त्यांनी नाकारले. न्यायाधीश बनण्यासही त्यांनी नकार दिला.

१९६६ मध्ये उभारला पुतळा

१९६६ मध्ये महाल येथील चिटणवीस पार्क स्टेडियम चौकात रामभाऊ रुईकरांचा पुतळा उभारण्यात आला. तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण व मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण झाले. १९९५ मध्ये त्यांच्या शंभराव्या जयंतीला राष्ट्रपतींच्या हस्ते टपाल तिकीटही काढण्यात आले. ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते. याच चौकात देवडिया काँग्रेस भवनही आहे. मात्र, काँग्रेसलाच आपल्या सच्च्या कार्यकर्त्याचे विस्मरण पडलेले आहे. मनपाने या महान पुरुषाची जयंती-पुण्यतिथी साजरी करावी आणि पुतळ्याची स्वच्छता व निगा राखावी, अशी भावना इंटकचे सचिव मुकुंद मुळे यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: government forget about the founder of trade unions rambhau ruikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.