सरकारी धान्याची होतेय काळाबाजारी : रेशन दुकानात येते निकृष्ट धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 10:19 PM2020-09-26T22:19:54+5:302020-09-26T22:21:20+5:30
कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन झाल्यानंतर अन्न पुरवठा विभागाचे महत्त्व भरपूर वाढले. रेशनच्या धान्याने लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात लोकांचे पोट भरले. जे कार्डधारक कधी रेशनच्या दुकानात जात नव्हते, त्यांनीही कार्डवर मिळणारे रेशन घेतले. रेशनची अचानक मागणी वाढल्याने या वितरण व्यवस्थेतील दुष्परिणामही सामोर आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन झाल्यानंतर अन्न पुरवठा विभागाचे महत्त्व भरपूर वाढले. रेशनच्या धान्याने लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात लोकांचे पोट भरले. जे कार्डधारक कधी रेशनच्या दुकानात जात नव्हते, त्यांनीही कार्डवर मिळणारे रेशन घेतले. रेशनची अचानक मागणी वाढल्याने या वितरण व्यवस्थेतील दुष्परिणामही सामोर आले. या प्रक्रियेत असलेल्या यंत्रणेकडूनच आता सरकारी धान्याची एफसीआयच्या गोदामातूनच काळाबाजारी होत असल्याचे आरोप होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या एफसीआयच्या गोदामामधून सरकारी धान्याचे वितरण रेशन दुकानदारांना होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहर व ग्रामीण भागात रेशनचा पुरवठा करण्यासाठी गणेश कॅरिअर या एजन्सीला कंत्राट दिले आहे. या कंत्राटदाराने पुरवठ्यासाठी काही सबएजंट नेमले आहेत. यातील काही सब एजंटचे एफसीआयच्या अधिकाऱ्यासोबत संगनमत आहे. काही सब एजंटला चांगल्या प्रतीचे धान्य रेशनच्या दुकानासाठी दिले जात आहे. चांगल्या प्रतीचे हे धान्य काळाबाजारात थोड्या जास्त किंमतीत विकले जात असल्याची माहिती आहे. एफसीआयच्या गोदामात अन्न पुरवठा विभागाचे अधिकारीही नियुक्त असतात. पण हा सर्व प्रकार संगनमताने होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
जुलै महिन्यात मिळाला निकृष्ट गहू
जुलै महिन्यात रेशन दुकानात निकृष्ट दर्जाचा गहू मिळाला होता. यासंदर्भात एफडीओला तक्रार केली होती. त्यांनी बदली करून मिळेल, असे सांगितले. काही रेशन दुकानदारांनी वितरित केला. पण काही रेशन दुकानदारांकडे अजूनही स्टॉक आहे. त्यांना बदलून द्यायला तयार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
वखार महामंडळात होते चालबाजी
वखार महामंडळातून तांदळाचा पुरवठा रेशन दुकानदारांना होतो. ५० किलोचे तांदळाचे पोते बाहेरून येतात. काटा करण्याच्या बहाण्याने पोत्याची शिलाई काढून एक ते दीड किलो तांदूळ काढण्यात येतो. पोत्यात हाताने शिलाई मारून रेशनच्या दुकानात पाठविली जात असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.