शासकीय धान खरेदीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:07 AM2020-12-27T04:07:51+5:302020-12-27T04:07:51+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : महादुला (ता. रामटेक) येथे राज्य शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने शासकीय धान खरेदी केंद्र सुरू ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : महादुला (ता. रामटेक) येथे राज्य शासनाच्या आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून, तिथे शनिवार(दि. २६) आधारभूत किमतीप्रमाणे धान खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील धान उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
पूर्वी आदिवासी विकास महामंडळाचे शासकीय धान खरेदी केंद्र भंडारबाेडी (ता. रामटेक) येथे हाेते. ते यावर्षीपासून बंद करण्यात आले असून, येथील खरेदी केंद्र बेरडेपार (ता. रामटेक) येथे स्थानांतरित करण्यात आले आहे. या भागातील शेतकऱ्यांना जंगलव्याप्त भागातील बेरडेपार येथील केंद्रावर धान विकायला नेणे शक्य नव्हते. त्यामुळे भंडारबाेडी येथील धान खरेदी केंद्र पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली हाेती. याबाबत ‘लाेकमत’मध्ये वृत्त प्रकाशित करून पाठपुरावा करण्यात आला हाेता.
परिणामी, प्रशासनाने भंडारबाेडी ऐवजी महादुला येथे शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. आ. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते शनिवारी काटापूजन करून या केंद्रावर धानाच्या खरेदीला प्रारंभ करण्यात आला. धान साठविण्यासाठी आदिवासी विकास महामंडळाने महादुला येथील रमेश माेहने यांचे गाेडाऊन किरायाने घेतले आहे. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे, उपनिबंधक रवींद्र वसू, सरपंच रेखा चाैरे, धनराज झाडे, आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी व शेतकरी उपस्थित हाेते.
...
काळजी घेणे गरजेचे
या केंद्रावर साधारण प्रतिचा धान प्रति क्विंटल १,८६८ रुपये तर ग्रेड अ प्रतिचा धान प्रति क्विंटल १,८८८ रुपयांप्रमाणे खरेदी केला जाणार आहे. शिवाय, शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ७०० रुपयांचा बाेनस दिला जाणार आहे. हे खरेदी केंद्र उशिरा सुरू करण्यात आले. या भागातील काही शेतकऱ्यांनी आर्थिक अडचणींमुळे व्यापाऱ्यांना धान विकले आहे. व्यापारी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सातबाराच्या आधारे या केंद्रावर धान विक्री करण्याची शक्यता बळावली आहे. मागील वर्षी भंडारबाेडी केंद्रावर असा प्रकार घडल्याचा आराेप शेतकऱ्यांनी केला हाेता. यात शेतकऱ्यांचे नुकसान हाेत असल्याने यावर्षी अधिकाऱ्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.