सरकारने जनतेचा भ्रमनिरास केला : आशिष देशमुख यांचा आमदारकीला ‘रामराम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 09:13 PM2018-10-02T21:13:04+5:302018-10-02T21:14:00+5:30
मागील काही काळापासून सातत्याने केंद्र व राज्य शासनावर उघडपणे टीका करणारे काटोल येथील आशिष देशमुख यांनी अखेर आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा पाठविला. मात्र त्यांनी अद्यापही भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. परंतु लवकरच ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, असे कयास राजकीय वर्तुळात लावण्यात येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील काही काळापासून सातत्याने केंद्र व राज्य शासनावर उघडपणे टीका करणारे काटोल येथील आशिष देशमुख यांनी अखेर आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मंगळवारी गांधी जयंतीच्या मुहूर्तावर त्यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा पाठविला. मात्र त्यांनी अद्यापही भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. परंतु लवकरच ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, असे कयास राजकीय वर्तुळात लावण्यात येत आहेत.
आशिष देशमुख हे काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्रातून २०१४ साली निवडून आले होते. मात्र वर्षभरानंतरच देशमुख यांनी राज्य शासनाच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली होती. राज्य सरकारच्या धोरणांच्या विरोधात त्यांनी नागपूरमध्ये ठिय्या आंदोलनही केले होते. वेगळ्या विदर्भावरून मुख्यमंत्र्यांना रोखठोक पत्र पाठविल्यानंतर देशमुख राजीनामा देतील असे अंदाज लावण्यात येत होते, मात्र त्यांनी ‘वेट अॅन्ड वॉच’ची भूमिका घेतली होती. अखेर मंगळवारी त्यांनी राजीनाम्याचे पाऊल उचलले. बुधवारी ते मुंंबईला जाऊन विधानसभा अध्यक्षांना भेटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, देशमुख यांच्या पुढील राजकीय भविष्याबाबत विविध कयास लावण्यात येत असून ते पुढील निवडणूक नेमकी कुठून लढणार, यावर राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला आहे.
सेवाग्राममध्ये राहुल गांधींचे केले स्वागत
आशिष देशमुख यांनी मंगळवारी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना राजीनाम्याचे पत्र पाठविले व त्यानंतर त्यांनी थेट सेवाग्राम गाठले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जाहीर सभेदरम्यान देशमुख यांनी मंचावर येऊन त्यांचे स्वागत केले व एक पुस्तकदेखील भेट दिले. यावेळी दर्शकांमध्ये त्यांचे वडील व माजी मंत्री रणजित देशमुख हेदेखील उपस्थित होते.
अद्याप काँग्रेस प्रवेश नाही : आशीष देशमुख
/>‘लोकमत’ने आशिष देशमुख यांच्याशी संपर्क केला असता अद्याप आपण काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मागील वर्षी मी विदर्भात सगळीकडे फिरलो. येथील शेतकरी, तरुणाईच्या समस्या मागील चार वर्षांपासून सुटलेल्या नाही. यासंदर्भात पक्ष व राज्य सरकारकडे मी वारंवार लक्ष वेधले, मात्र यात कोणताही फरक दिसला नाही. शेतकरी व जनतेचा सरकारने भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सत्याचा मार्ग स्वीकारत मी राजीनामा दिला आहे. मी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. यापुढील निर्णय मी लवकरच घेईल, असेदेखील त्यांनी सांगितले.