नाणार प्रकल्पावरुन सरकारला तोंडघशी पडायचेय? - नितेश राणे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2018 11:52 AM2018-07-13T11:52:44+5:302018-07-13T11:53:45+5:30
जैतापूर व नाणार यादरम्यानचे अंतर हा मुख्य मुद्दा, कोकणातील पारंपारिक उद्योगावर संकट
नागपूर: नाणार प्रकल्प करून सरकारला त्याचे पुन्हा एन्रॉन करायचे आहे काय आणि तोंडघशी पडायचे आहे काय असा प्रश्न काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी शुक्रवारी सकाळी विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना मांडला. नागपूर येथील पावसाळी अधिवेशनात गुरुवारी सर्व विरोधी पक्षांनी नाणारबाबत सभागृहात गोंधळ घातल्याने कालचे कामकाज होऊ शकले नाही या पार्श्वभूमीवर सरकारकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत या प्रश्नाला ते उत्तर देत होते.
नाणारचा मुद्दा रेकॉर्डवर घ्यावा असा आग्रह आम्ही सरकारला वारंवार करीत आहोत. त्यावर चर्चा घडवून आणली पाहिजे. सरकार जनतेपासून काहीतरी लपवीत असल्याचा आम्हाला संशय आहे. सरकारने यासंदर्भात निवेदन द्यावं अशी मागणी आम्ही आज सभागृहात करणार आहोत.
जैतापूर आणि नाणार या दोन्ही प्रकल्पांमधील अंतर अतिशय कमी असल्याने या प्रदेशाला कायमच धोक्याच्या सावटाखाली रहावं लागणार आहे. आंतरराष्ट्रीय मानकांनुसार इतक्या कमी अंतरावर दोन प्रकल्प चालवताही येत नाहीत. ज्या कंपनीला या प्रकल्पाचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे त्याबाबतही आम्ही साशंक आहोत असे मत राणे यांनी पुढे व्यक्त केले.