‘मारबत महोत्सवा’साठी सरकारचा पुढाकार : पालकमंत्र्यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 09:14 PM2019-08-26T21:14:02+5:302019-08-26T21:17:14+5:30

लोकमतमध्ये उमटलेल्या ‘एमटीडीसीला मारबत महोत्सवाचा विसर’ या मथळ्याखालील बातमीची दखल राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे. त्याच बातमीचा उल्लेख करीत त्यांनी ‘मारबत महोत्सवा’साठी राज्य सरकार पुढाकार घेईल, अशी घोषणा आज नागपुरात केली.

Government initiative for 'Marbat Festival': Guardian Minister's testimony | ‘मारबत महोत्सवा’साठी सरकारचा पुढाकार : पालकमंत्र्यांची ग्वाही

मारबत गीत व चित्रपटाच्या पोस्टरचे लोकार्पण करताना चंद्रशेखर बावनकुळे, सोबत डॉ. गिरीश गांधी, अलका कुबल-आठल्ये, समीर आठल्ये, विनोद देशपांडे

googlenewsNext
ठळक मुद्दे‘मारबत’वरील गीताचा लोकार्पण सोहळा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २० ऑगस्ट रोजी दैनिक लोकमतमध्ये उमटलेल्या ‘एमटीडीसीला मारबत महोत्सवाचा विसर’ या मथळ्याखालील बातमीची दखल राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली आहे. त्याच बातमीचा उल्लेख करीत त्यांनी ‘मारबत महोत्सवा’साठी राज्य सरकार पुढाकार घेईल, अशी घोषणा आज नागपुरात केली.


सोमवारी श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात ‘बकाल’ चित्रपटातील ‘घेऊन जा गे मारबत’ या नागपुरातील प्रसिद्ध मारबत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या गाण्याचे लोकार्पण बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्यांनी काहीच दिवसापूर्वी मारबत महोत्सवाकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याची बातमी लोकमतमध्ये वाचल्याचा उल्लेख केला. मारबत महोत्सव हा आपल्या इतिहास आणि संस्कृतीतून मिळालेला वारसा आहे. या महोत्सवाला आणखी उभारी देण्याची गरज असून, यासाठी सरकार पुढाकार घेणार असल्याचे ते म्हणाले. आम्ही या बातमीची आणि महोत्सवाची दखल घेतली असून, सरकारी यंत्रणा या महोत्सवात सहभाग घेतील आणि हा महोत्सव जगपातळीवर घेतला जाईल, असे खंबीर आश्वासन चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिले. ‘घेऊन जा गे मारबत’ हे गाणे नागपुरातील गीत लेखक सुरेंद्र मसराम यांनी लिहिले असून, त्याला मोरेश्वर निस्ताने यांनी संगीतबद्ध केले आहे. तर आदर्श शिंदे व धनश्री देशपांडे या आघाडीच्या गायकांनी स्वरबद्ध केले आहे. याप्रसंगी वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी, प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये, दिग्दर्शक समीर आठल्ये, ज्येष्ठ अभिनेता देवेंद्र दोडके, अभिनेता चैतन्य मेस्त्री, अभिनेत्री जुई बेंडखळे, कथाकार विनोद देशपांडे, नृत्य दिग्दर्शक दिलीप मेस्त्री व दीपा मेस्त्री, रूपाली कोंडेवार-मोरे, मालती दादलानी उपस्थित होते. यावेळी पिवळी मारबत उत्सव समितीचे प्रकाश गौरकर व काळी मारबत उत्सव समितीचे मिलिंद मदने यांचा सत्कार करण्यात आला.
एमटीडीसीकडून सातत्याने डावलला जातोय ‘मारबत महोत्सव’
इंग्रजी सत्तेविरोधात निर्माण झालेल्या आक्रोशाला परंपरेचे आवरण घालत, देशभक्तांना एकत्रित आणण्याच्या हेतूने १३९ वर्षांपूर्वी नागपुरात ‘मारबत महोत्सव’ आकाराला आला. इंग्रजांच्या नजरेत देशभक्तांचा आक्रोश भरू नये म्हणून त्याला पुतणा मावशी व श्रीकृष्णाचा संदर्भ देऊन हा महोत्सव वाढत गेला. मात्र, या महोत्सवाकडे शासनाचे कधीच लक्ष गेले नाही. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी)नेही या महोत्सवाला उभारी देण्याचे कधीच प्रयत्न केले नाही. नागपूर विभाग आणि मुख्य कार्यालयाच्या समन्वयाअभावी हा महोत्सव अजूनही एमटीडीसीच्या यादीत आलेला नाही, हे विशेष. नेमकी हीच बाजू प्रकाशात आणण्याचे कार्य लोकमतने केले आहे.

Web Title: Government initiative for 'Marbat Festival': Guardian Minister's testimony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.