सरकारचा न्याय व्यवस्थेतील हस्तक्षेप वाढला : नाना पटोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 08:11 PM2018-01-13T20:11:33+5:302018-01-13T20:13:50+5:30
देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांना समोर येत पत्रकार परिषद घ्यावी लागते, याचा अर्थ न्यायव्यवस्थेवर कुणीतरी दबाव टाकत आहे. देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. सरकारचा न्यायव्यवस्थेतील हस्तक्षेप वाढला आहे, असा आरोप नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेले माजी खासदार नाना पटोले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायाधीशांना समोर येत पत्रकार परिषद घ्यावी लागते, याचा अर्थ न्यायव्यवस्थेवर कुणीतरी दबाव टाकत आहे. देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. सरकारचा न्यायव्यवस्थेतील हस्तक्षेप वाढला आहे, असा आरोप नुकतेच काँग्रेसमध्ये प्रवेश घेतलेले माजी खासदार नाना पटोले यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केला.
पटोले म्हणाले, गेली अनेक वर्षे काँग्रेसने देशाच्या संवैधानिक व्यवस्थेला सांभाळून ठेवले. सद्यस्थितीत केंद्र व राज्य सरकार नको तेवढा हस्तक्षेप करून न्यायव्यवस्थेचे धिंडवडे काढत आहेत. याचा परिणाम लोकशाहीवर होत आहे. चार न्यायाधीशांनी मांडलेल्या भूमिकेमुळे आमच्या म्हणण्याला बळ मिळाले आहे. चार न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्यांना असे जाहीरपणे भाष्य करता येते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मात्र, न्या लोया यांच्या मृत्यूनंतर न्या. शुक्रे व न्या. गवई यांनी डायसच्या खाली येऊन न्या. लोया यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे सांगितले होते. त्यावेळी त्यांना कुणी हा प्रश्न का विचारला नाही, असा प्रश्नही पटोले यांनी उपस्थित केला. सोबतच दोन न्यायमूर्ती असे समोर स्पष्टीकरण देतात तेव्हा न्यायव्यवस्थाही कुणाच्या दबावात आली का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
न्या. लोया यांचा मृत्यू झाला त्यावेळी त्यांना रविभवनातून इस्पितळात नेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, रविभवनात डिसेंबर २०१४ च्या रेकॉर्ड रजिस्टरमध्ये न्या. लोया यांच्या वास्तव्याची कुठलीच नोंद नाही. न्या. लोया यांचा मृत्यू नागपुरात झाला. त्यांचा मृत्यू नैसर्गिक नसल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. हे प्रकरण आता न्यायालयात असून ते कोणत्या बेंचसमोर चालावे यावरून न्यायाधीशांना टोकाची भूमिका घ्यावी लागली आहे. न्या. लोया यांच्या मृत्यूची योग्य चौकशी व्हावी, अशी मागणीही पटोले यांनी केली. यावेळी जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार उपस्थित होते.