सरकारची नोटीस, कर्मचारी संपावर ठाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 10:13 PM2018-08-08T22:13:06+5:302018-08-08T22:15:21+5:30
कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय संपामुळे नागपूर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही शासकीय कामकाज ठप्प पडले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदविल्याने दैनंदिन कामे खोळंबली. यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. दुसऱ्या दिवशी शिक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांनीही ताकतीनिशी संपात सहभाग घेतल्यामुळे जिल्ह्यातील शेकडो शाळा-ग्रामीण रुग्णालये बंद होते. दरम्यान काम खोळंबत असल्याने कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस नागपूर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खंजांजी यांनी संपावर असलेल्या महसूल कर्मचाऱ्यांना बजावली आहे. परंतु कर्मचारी मात्र संपावर ठाम आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय संपामुळे नागपूर जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही शासकीय कामकाज ठप्प पडले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासह इतर शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदविल्याने दैनंदिन कामे खोळंबली. यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय झाली. दुसऱ्या दिवशी शिक्षक व आरोग्य कर्मचाऱ्यांनीही ताकतीनिशी संपात सहभाग घेतल्यामुळे जिल्ह्यातील शेकडो शाळा-ग्रामीण रुग्णालये बंद होते. दरम्यान काम खोळंबत असल्याने कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस नागपूर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खंजांजी यांनी संपावर असलेल्या महसूल कर्मचाऱ्यांना बजावली आहे. परंतु कर्मचारी मात्र संपावर ठाम आहेत.
सातवा वेतन आयोग त्वरित लागू करावा, अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनीच पेन्शन योजना लागू करावी, पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा, खासगीकरण, कंत्राटीकरण धोरण रद्द करा, सेवानिवृत्ती वय ६० वर्षे करा आदी प्रमुख मागण्यांसाठी हा संप सुरू आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी जिल्ह्यात संपाला चांगला प्रतिसाद मिळाला. नागपूर शहर व ग्रामीण भागातील बहुतांश शासकीय कार्यालये कर्मचाऱ्यांविना ओस पडली होती. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, विभागीय आयुक्त कार्यालय इमारतीतील कार्यालये आदी कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. यामुळे शासनाचा कोट्यवधीचा महसूलही बुडाला. संविधान चौकात संपकरी कर्मचाऱ्यांनी दुसऱ्याही दिवशी शक्तीप्रदर्शन करून, सरकारवर दबाव बनविण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण शासकीय यंत्रणा दुसऱ्याही दिवशी रस्त्यावर उतरली होती. त्याचा फटका मात्र, सामान्यांना बसला. शासकीय कामकाजासाठी सरकारी कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना कर्मचाऱ्यांअभावी रिकाम्या हाताने परतावे लागले.
कर्मचाऱ्यांनी दैनंदिन कामकाजात सहभाग घेतला नाही. त्यामुळे शासकीय कामकाज प्रभावित झाले. महसूल विभागातील कर्मचारी संपावर असल्याने नागरिकांना महत्त्वाचे दाखले मिळू शकले नाही. शिक्षकांच्या सहभागामुळे शाळाही बंद होत्या. ज्या शिक्षक संघटनांनी संपाला पाठिंबा दिला, त्यांनी काळ्या फिती लावून अध्यापनाचे कार्य केले. ग्रामीण आरोग्य यंत्रणेतील नर्सेस, फार्मासिस्ट, शिपाई, शासकीय वाहनावरील चालक, लिपीक संपात सहभागी झाल्याने त्याचा फटका रुग्ण व्यवस्थेला बसला.
कामे खोळंबली, नोटीस बजावली
संपामुळे शासकीय कामावर परिणाम पडला आहे. कामे खोळंबली आहेत. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना तातडीने कामावर हजर होण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. कामावर हजर न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशाराही या नोटीसद्वारे देण्यात आला आहे.
रवींद्र खजांजी
निवासी उपजिल्हाधिकारी
संप कायम राहणार
संपामुळे शासनाची गैरसोय होत आहे. त्यामुळेच नोटीस बजावण्यास आली आहे. परंतु आमचा संप सुरूच आहे. यासंदर्भात आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. त्यांचे आदेश येत नाहीत, तोपर्यंत आमचा संप सुरू राहील.
देवेंद्र शिंदोडकर : अध्यक्ष
नागपूर जिल्हा तृतीय श्रेणी महसूल कर्मचारी संघटना