सरकारी कार्यालयातील शौचालय घाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:08 AM2021-03-20T04:08:13+5:302021-03-20T04:08:13+5:30

आरोग्यदायी शौचालय चळवळ आंदोलनाने केली प्रशासनाची पोलखोल नागपूर : सरकारी कार्यालयाच्या इमारतीत ठिकठिकाणी तंबाखू खर्ऱ्यामुळे भिंती रंगलेल्या आहेत, शौचालयाच्या ...

Government office toilets dirty | सरकारी कार्यालयातील शौचालय घाण

सरकारी कार्यालयातील शौचालय घाण

Next

आरोग्यदायी शौचालय चळवळ आंदोलनाने केली प्रशासनाची पोलखोल

नागपूर : सरकारी कार्यालयाच्या इमारतीत ठिकठिकाणी तंबाखू खर्ऱ्यामुळे भिंती रंगलेल्या आहेत, शौचालयाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष असल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. सरकारी कार्यालयातील शौचालयाच्या दुरवस्थेची पोलखोल आरोग्यदायी शौचालय चळवळ आंदोलन या संस्थेने केली.

या संस्थेच्या पाच सदस्यांनी आकस्मिकपणे जिल्हा परिषद व प्रशासकीय इमारतीतील शौचालयाचे निरीक्षण केले. या निरीक्षण टीममध्ये अध्यक्ष अरुणा पुरोहित, सचिव डॉ. रवी गिऱ्हे, सहसचिव सुप्रिया मंगरुळकर, सदस्य दत्ता फडणवीस, सदस्या शैलजा पिंगळे सहभागी होते. या टीमने सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या शौचालयाचे निरीक्षण केले. जिल्हा परिषदेच्या जुन्या व नवीन दोन्ही इमारतीतील महिला व पुरुष दोन्ही शौचालये अस्वच्छ होती. आजूबाजूचा परिसरही घाण होता. जवळच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होती. त्या ठिकाणी लोकांनी पान/तंबाखू खाऊन थुंकलेले होते. नवीन इमारतीतील तिन्ही मजल्यांवरील शौचालयांची अशीच स्थिती होती. महिला शौचालयांमध्ये डस्टबीन, पेपर नॅपकिन, सॅनिटायझर उपलब्ध नव्हते. इमारतीत कुठेही व्हेंडिंग मशीन उपलब्ध नव्हती.

- प्रशासकीय इमारतीमधील स्वच्छता वाऱ्यावर

प्रशासकीय इमारत क्रमांक २ मध्ये समितीतर्फे निरीक्षण केले असता, नगर रचना मूल्यांकन कार्यालय परिसरातील शौचालयातून घाण वास पसरला होता. या इमारतीत मोठ्या संख्येने महिला कर्मचारी कार्य करतात. कोणत्याही शौचालयात डस्टबीन, पेपर नॅपकिन, सॅनिटायझर नव्हते. कुठेही व्हेंडिंग मशीन नव्हती. इमारतीतील लिफ्ट व खिडक्या तंबाखूने भरलेल्या होत्या. सफाई कर्मचाऱ्यांवर कुणाचेही नियंत्रण नव्हते.

- महिला कर्मचाऱ्यांनी केल्या तक्रारी

प्रशासकीय इमारतीतील सरकारी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी शौचालयाच्या त्रासाबद्दल त्रागा व्यक्त केला. विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आमच्याकडे याचे मेंटेनन्स नाही.

- जि.प. अध्यक्षांनी दिले आश्वासन

जिल्हा परिषदेच्या शौचालयाच्या स्थितीसंदर्भात संस्थेच्या सदस्यांनी अध्यक्ष रश्मी बर्वे यांची भेट घेऊन त्यांना कार्यालयातील शौचालयाच्या दुरवस्थेची माहिती दिली. त्यांनी वस्तुस्थिती जाणून समितीला आश्वासन दिले की, पुढील एक आठवड्यात सर्व शौचालये स्वच्छ दिसतील.

Web Title: Government office toilets dirty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.