शासन नुसतेच बोलते करत काहीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 09:58 PM2018-02-09T21:58:12+5:302018-02-09T22:00:25+5:30
मी शासनाला विनंती केली की ते पक्षीकोश तुम्ही छापा, किंवा अनुदान द्या, जेणेकरून त्याची किंमत कमी होईल व ते जास्तीजास्त लोक वाचू शकतील. पण शासन नुसतेच बोलते करत काहीच नाही, अशी खंत ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मी तब्बल १२ वर्षे कठोर परिश्रम घेऊन पक्षीकोश, प्राणीकोश लिहिले. पण ललित लेख छापायला आतूर असलेल्या प्रकाशकांना माझे अभ्यासपूर्ण कोश छापायचे नसतात. ते त्याला नकार देतात. कारण असे पक्षीकोश छापायला पैसे खूप लागतात. मग त्यांची किंमत वाढते आणि ग्राहक मिळत नाहीत. मी शासनाला विनंती केली की ते पक्षीकोश तुम्ही छापा, किंवा अनुदान द्या, जेणेकरून त्याची किंमत कमी होईल व ते जास्तीजास्त लोक वाचू शकतील. पण शासन नुसतेच बोलते करत काहीच नाही, अशी खंत ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ मारुती चितमपल्ली यांनी व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व एमईसीएलतर्फे खामल्यातील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या परिसरात आयोजित ग्रामायण या तीन दिवसीय प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. मेरा गाव मेरा तीर्थ असे ब्रिद असलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून महापौर नंदा जिचकार, कांचन गडकरी, डॉ. विलास डांगरे, अनिल सांभरे, नारायण मेहरे, आर. एन. झा उपस्थित होते. चितमपल्ली पुढे म्हणाले, पक्षीकोश, प्राणीकोश लिहून झाले आहे. वृक्षकोश आणि मत्स्यकोसाचे काम सुरू आहे. हे लिखाण फार कठीण आहे. माझ्याशिवाय ते इतर कुणीच करू शकणार नाही. मलाही इतके लिहिताना त्रास होतो. पण, निबीड अरण्यातील ज्ञानाचा हा खजिना नवीन पिढीपर्यंत पोहोचावा यासाठी माझी ही सर्व धडपड आहे. महापौर म्हणाल्या, गावातील तरुणांना त्यांच्या गावातच रोजगार मिळाला तर ते शहरात येणार नाहीत. शेतकºयांचे आर्थिक चित्र बदलायचे असेल तर अशा प्रदर्शनांचे आयोजन सातत्याने व्हायला हवे. कांचन गडकरी म्हणाल्या, निसर्ग आपल्याला सर्व काही देतो आणि आपण निसर्गाचेच नुकसान करतो. हे योग्य नाही. आता शहरातील लोक शांततेच्या शोधात गावाकडे जात आहेत. दिल्ली की धापेवाडा असा प्रश्न मला कुणी विचारला तर मी धापेवाड्याला पसंती देईल. कारण, तिथे शांती आहे. अशा प्रदर्शनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कला ते उद्योग असा प्रवास व्हायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. संचालन कविता भोपळे तर आभार चंद्रकांत रागीट यांनी मानले. या प्रदर्शनात अनेक ग्रामीण कलावंतांच्या कलाकृती पाहता येणार आहेत.