सरकार पाकीटमार मंत्री घोटाळेबाज
By admin | Published: December 23, 2015 03:39 AM2015-12-23T03:39:44+5:302015-12-23T03:39:44+5:30
राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ सरकारला ‘पाकीटमार’ची पदवी देते.
विखे पाटील यांची घणाघाती टीका : मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
नागपूर : राज्य सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ सरकारला ‘पाकीटमार’ची पदवी देते. एवढेच काय तर उच्च न्यायालयादेखील प्रशासकीय कामांमध्ये मंत्र्यांच्या वाढत्या हस्तक्षेपावर ताशेरे ओढावे लागतात. डाळींचे भाव सामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर झाल्यानंतर त्यावर नियंत्रण आणण्यात सरकार अपयशी ठरते, अशी घणाघाती टीका करीत पाकीटमार सरकारमधील घोटाळेबाज मंत्र्यांनी राजीनामे द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी विधानसभेत केली.
नियम २९२ अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना विखे पाटील म्हणाले, शिवसेना व भाजपमध्ये समन्वय नसल्यामुळे प्रशासकीय कामात अडथळे निर्माण होत आहेत. यामुळेच सरकारला डाळीच्या किमतीवर नियंत्रण आणण्यात अपयश आले. डाळीचे दरवाढीत चार हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करीत अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली. सनातन संस्थेला क्लीन चिट देणाऱ्या गृहराज्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याची मागणीही त्यांनी केली. राज्यात महिला व दलितांवरील अत्याचार वाढत असल्याचा आरोप करीत पूर्णवेळ गृहमंत्री नेमण्याची मागणी त्यांनी केली. आदिवासी विभागात ई-टेंडर न करता लाखो रुपयांची साहित्य खरेदी करण्यात आली आहे. कुपोषणग्रस्त बालकांच्या आहार पुरवठ्यातही घोटाळा झाल्याचा आरोप करीत आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली. नागपूरच्या मेडिकल कॉलेजमधील प्रकरणाचा हवाला देत त्यांनी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.(प्रतिनिधी)