शासकीय अभिलेख आता नागरिकांसाठी उपलब्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 11:27 AM2018-12-13T11:27:25+5:302018-12-13T11:28:55+5:30
शासकीय कार्यालयांमधील अभिलेख आता सामान्य नागरिकांना पाहता येणे शक्य आहे. शासनाने यासंदर्भात नागरिकांना अभिलेख उपलब्ध करून देण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच शासन परिपत्रकसुद्धा जारी केले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय कार्यालयांमधील अभिलेख आता सामान्य नागरिकांना पाहता येणे शक्य आहे. शासनाने यासंदर्भात नागरिकांना अभिलेख उपलब्ध करून देण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच शासन परिपत्रकसुद्धा जारी केले आहेत.
शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे की, शासकीय कामकाजात अधिक पारदर्शकता येण्यासाठी व माहिती अधिकार अधिनियमांतर्गत प्राप्त माहिती अर्जाची, प्रथम व द्वितीय अपीलांची संख्या कमी होण्याच्या दृष्टीने राज्यातील जिल्हास्तरीय कार्यालयांपासून ते निम्मस्तरीय सर्व कार्यालयात तसेच महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद इत्यादी सर्व कार्यालयात प्रत्येक सोमवारी किंवा सदर दिवशी सार्वजनिक सुटी असल्यास त्यानंतरच्या कार्यालयीन दिवशी दुपारी ३ ते ५ या वेळेत नागरिकांना माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत विहित प्रक्रियेनुसार त्यांच्या मागणीनुसार अभिलेख अवलोकनासाठी उपलब्ध करून द्यावेत.
प्रत्येक कार्यालय प्रमुखांनी स्थानिक परिस्थितीच्या अनुषंगाने आवश्यक दुरुस्तीसह नागरिकांना अभिलेख अवलोकनासाठी उपलब्ध करून देण्याच्या व्यवस्था आपापल्या कार्यालयात करावी, असे आदेश अपर मुख्य सचिव बिपीन मलिक यांनी काढलेल्या शासन परिपत्रकाद्वारे स्पष्ट केली आहे.
माहितीचा अधिकार अधिनियम २००५ प्राप्त होणाऱ्या माहिती अर्जाची संख्या कमी होण्याच्या दृष्टीने व कामकाजात पारदर्शकता येण्यासाठी पुणे महानगरपालिकेने नागरिकांना अवलोकनासाठी अभिलेख उपलब्ध करून देण्याचा प्रयोग केला होता. तो आता राज्यभरात अवलंबण्यात येत आहे
हे विशेष.