नागपुरात पोलिसांनी पकडला लाखो रुपयाचा शासकीय तांदूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:07 IST2018-03-17T00:07:47+5:302018-03-17T00:07:57+5:30
पोलिसांनी शुक्रवारी रात्री कारवाई करीत शासकीय धान्याची काळाबाजारी उघडकीस आणली. झोन पाचच्या पथकाने शुक्रवारी रात्री कापसी पुलाजवळ ही कारवाई केली. या कारवाईत तब्बल पाच लाख रुपयाचा तांदूळ पकडण्यात आला. याबाबत पोलीस अधिक माहिती देण्यास टाळत आहे, परंतु ट्रक चालक व क्लिनरला अटक केल्याचे सांगितले जाते.

नागपुरात पोलिसांनी पकडला लाखो रुपयाचा शासकीय तांदूळ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पोलिसांनी शुक्रवारी रात्री कारवाई करीत शासकीय धान्याची काळाबाजारी उघडकीस आणली. झोन पाचच्या पथकाने शुक्रवारी रात्री कापसी पुलाजवळ ही कारवाई केली. या कारवाईत तब्बल पाच लाख रुपयाचा तांदूळ पकडण्यात आला. याबाबत पोलीस अधिक माहिती देण्यास टाळत आहे, परंतु ट्रक चालक व क्लिनरला अटक केल्याचे सांगितले जाते.
पोलिसांना एम.एच./३५/३६५९ क्रमांकाच्या ट्रकद्वारे शासकीय धान्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाचे पीएसआय मनीष गावंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कापसी पुलाजवळ ट्रक रोखला. त्याची तपासणी केली असता त्यात तांदळाची पोती होती. पोलिसांनी ट्रक चालक अनिल गुडेकर आणि क्लिनर प्रल्हाद गुडेकर याला ताब्यात घेतले.
मिळालेल्या माहितीनुसार कळमना नाका नंबर चारमधील गोदामातून ट्रकमध्ये तांदळाची पोती लोड करण्यात आली. यानंतर मौदा येथील सावली येथून सुद्धा तांदळाची पोती भरण्यात आली. तांदळाची ही पोती घेऊन गोंदियाला ट्रक जात होता. कापसी पुलाजवळ पोलिसांनी तो अडवला व तांदूळ जप्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार जप्त करण्यात आलेला तांदूळ हा गोंदिया येथील सुनील अग्रवाल नावाच्या व्यापाºयाच्या गोदामात पोहोचवण्यात येणार होता. अग्रवाल अनेक दिवसांपासून या धंद्यात आहे.
जप्त करण्यात आलेला तांदूळ रेशनच्या दुकानात आणि शालेय पोषण आहार योजनेंतर्गत वितरित करण्यात आला होता. काळाबाजारी करीत तो खासगी व्यापाऱ्या ला विकण्यात आला होता.
या प्रकरणाचा सखोल तपास केल्यास यात मोठे रॅकेट उघडकीस येऊ शकते. झोन पाचचे उपायुक्त सुहास बावचे यांनी कारवाईबाबत दुजोरा दिला. जप्त करण्यात आलेल्या तांदळाची पोती मोजल्यानंतर आणि ड्रायव्हर व क्लिनरची विचारपूस केल्यावरच याबाबत स्पष्ट काही सांगता येईल, असे सांगितले जात आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस चालक व त्याच्या साथीदाराची विचारपूस करीत होते.