शासनाने शेतकऱ्यांप्रती संवेदनशील व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 08:06 PM2019-03-19T20:06:22+5:302019-03-19T20:09:58+5:30
निसर्गाची साथ न मिळाल्यामुळे शेतीत हवे तसे उत्पादन होत नाही. उत्पादन झाले तरी योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येचा निर्णय घेतो. त्यामुळे शेतकऱ्यांना या आत्महत्येच्या सत्रातून बाहेर काढण्यासाठी शासनाने संवेदनशील होऊन शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निसर्गाची साथ न मिळाल्यामुळे शेतीत हवे तसे उत्पादन होत नाही. उत्पादन झाले तरी योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येचा निर्णय घेतो. त्यामुळे शेतकऱ्यांना या आत्महत्येच्या सत्रातून बाहेर काढण्यासाठी शासनाने संवेदनशील होऊन शेतकऱ्यांसाठी उपाययोजना करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले.
यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील चिलगव्हाण येथील साहेबराव पाटील करपे यांनी पत्नी व चार मुलांसह वर्धा, दत्तपूर येथील मनोहर कुष्ठधामात आत्महत्या केली होती. १९ मार्चला या घटनेला ३३ वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे जनमंचने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी महाराजबाग चौकातील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ््याजवळ अन्नदात्यासाठी सहवेदना या धरणे, विचारमंथन कार्यक्रमाचे आयोजन केले. जनमंचचे अध्यक्ष प्रमोद पांडे म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न अनेक वर्षांपासून जैसे थे आहेत. आत्महत्या कमी झालेल्या नाहीत. शेतमालाला भाव मिळत नाही. त्यामुळे शासनाने शेतकरी आत्मसन्मान योजनेची रक्कम वाढवून दिलासा देण्याची गरज आहे. जनमंच सिंचन शोध यात्रेला यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. अमिताभ पावडे म्हणाले, भरघोस उत्पादन झाल्यामुळे भाव घटून उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. तो कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो. त्यामुळे ही व्यवस्था बदलण्याची गरज आहे. रमेश बोरकुटे म्हणाले, देशात कोट्यवधी रुपये बुडवून उद्योगपती पळून जातात. परंतु शेतात राबूनही शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते. शासनाने त्यांना १० हजार पेन्शन देण्याची गरज आहे. सुधीर पालीवाल यांनी ग्लोबल वार्मिंगचा पर्यावरण, शेतीवर परिणाम होत असून जनमंचने याबाबत पुढाकार घेण्याचे आवाहन केले. रामभाऊ आखरे,चंद्रकांत विरखरे यांनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून शासनाने उपाययोजना करण्याची मागणी केली. जनमंचचे सहसचिव अॅड. मनोहर रडके यांनी सामूहिक शेती केल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचे सांगितले. दादा झोडे यांनी शेतीला दर्जा मिळवून देण्यासाठी शेतमालाला भाव, रोजंदारीची समस्या यातील असमतोल दूर करण्याची मागणी केली. प्रास्ताविकातून नरेश क्षीरसागर यांनी शेतकऱ्यांना आत्मबल देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. संचालन श्रीकांत दोड यांनी केले. यावेळी जनमंचचे सल्लागार प्रा. शरद पाटील, राजीव जगताप, टी. बी. जगताप, विनोद बोरकुटे, गणेश खर्चे, प्रल्हाद खरसने, विट्ठल जावळकर, लक्ष्मण सावळकर, प्रभाकर खोंडे, मुन्ना महाजन उपस्थित होते.