शासनाने एमपीएससीतील पदाधिकाऱ्यांची रिक्त पदे भरावीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:09 AM2021-07-07T04:09:36+5:302021-07-07T04:09:36+5:30
नागपूर : एमपीएससीच्या भोंगळ कारभारामुळे पुण्यातील २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. शासकीय दिरंगाईमुळे अनेक जण निराश झाले आहेत. उमेदवारांच्या ...
नागपूर : एमपीएससीच्या भोंगळ कारभारामुळे पुण्यातील २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. शासकीय दिरंगाईमुळे अनेक जण निराश झाले आहेत. उमेदवारांच्या लवकरात लवकर मुलाखती घेण्यात याव्यात व एमपीएससीतील पदाधिकाऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
दोन वर्षांपासून अनेक उमेदवार मुलाखतींच्या प्रतीक्षेत आहेत. एमपीएससीच्या आयोगात दोनच नियुक्त पदाधिकारी आहेत. रिक्त तीन जागांवर तातडीने नेमणूक करावी. त्यामुळे एमपीएससीची मुलाखतीची प्रक्रिया सुरळीत सुरू होईल. आत्महत्येचे पाऊल उचलणाऱ्या स्वप्निल लोणकर या तरुणाच्या कुटुंबीयांना २५ लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी भाजयुमोतर्फे करण्यात आली. जर एमपीएससीच्या उमेदवारांना दिलासा दिला नाही तर आक्रमक भूमिका घेण्यात येईल, असा इशारादेखील देण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष पारेंद्र पटले, सचिन करारे, दीपांशु लिंगायत, अमोल तिडके, संकेत कुकडे, गौरव हरडे, शेखर कूर्यवंशी, अमर धरमारे, पंकज सोनकर, बादल राऊत, सन्नी राऊत, यश सातपुते, शैलेश नेताम, इजाज शेख प्रामुख्याने उपस्थित होते.