सरकारने आंदोलनाची वेळ आणू नये : समस्त ब्राह्मण समाजाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 10:00 PM2019-08-01T22:00:25+5:302019-08-01T22:01:25+5:30
महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकारला यापूर्वी निवेदन दिले आहे. समस्त ब्राह्मण समाज महाराष्ट्राच्या वतीने मागण्यांसंदर्भातील सर्व कागदपत्रे सादर केली आहेत. असे असले तरी सरकार या मागणीकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे पुन्हा या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी ३ ऑगस्टला येथील संविधान चौकामध्ये घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा समस्त ब्राह्मण समाजाने दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकारला यापूर्वी निवेदन दिले आहे. समस्त ब्राह्मण समाज महाराष्ट्राच्या वतीने मागण्यांसंदर्भातील सर्व कागदपत्रे सादर केली आहेत. असे असले तरी सरकार या मागणीकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. त्यामुळे पुन्हा या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी ३ ऑगस्टला येथील संविधान चौकामध्ये घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा समस्त ब्राह्मण समाजाने दिला आहे. सरकारने समाजाच्या भावना ओळखाव्यात आणि आंदोलन करण्याची वेळ आणू नये, असा इशाराही गुरूवारी झालेल्या पत्रकार परिषदेतून देण्यात आला.
यावेळी मागण्यांसंदर्भात बोलताना समन्वयक विश्वजित देशपांडे म्हणाले, समाजाच्या वतीने २२ जानेवारीला मुंबईतील आझाद मैदानामध्ये धरणे देण्यात आले होते. त्यानंतर या मागण्या तत्त्वत: मान्य केल्याचे सरकारतर्फे शिष्टमंडळाला सांगितले होते. प्रत्यक्षात मागण्यांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याचे लक्षात आले आहे. राज्यातील ब्राह्मण समाजाच्या ४८ संघटनांनी एकत्र येऊन समस्त ब्राह्मण समाजाची स्थापना केली आहे. या माध्यमातून समाजाच्या प्रश्नांसाठी लढा दिला जात आहे. समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे, पुरोहितांना मानधन देणे, महापुरुषांच्या बदनामीविरोधात कायदा करणे, वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करण्यासाठी कायदा तयार करणे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार घोषित करणे, राम गणेश गडकरी आणि दादोजी कोंडदेव यांचे पुतळे सन्मानासह स्थापन करणे, छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक लवकर पूर्ण करणे, यासह १४ मुख्य मागण्यांचा यात समावेश आहे.
आंदोलनासंदर्भात माहिती देताना विश्वजित देशपांडे म्हणाले, आमचा समाज साडेतीन टक्के असल्याचे सांगितले जाते, प्रत्यक्षात साडेसात टक्के आहे. राज्यात समाजाची लोकसंख्या ८५ लाख असून, सर्व समाज एकसंघ आहे. राज्यातील ५५ आमदार निवडून आणण्याची ताकद या समाजामध्ये आहे. सरकारने समाजाच्या भावना समजून घ्याव्यात. हा जनरेटा आहे, त्यामुळे सहजपणे घेऊ नये, असा निर्वाणीचा इशारा समाजाकडून आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून देणार असल्याचे ते म्हणाले.
३ ऑगस्टला होणाऱ्या आंदोलनादरम्यान घंटानाद आणि शंखनाद केला जाईल. मुख्यमंत्र्यांच्या शहरातच हे आंदोलन करून त्यांचे लक्ष वेधण्यासाठी सर्वजण एकत्र येत असल्याचे त्यांनी सांगितले. निर्णय न झाल्यास भविष्यात वेगळे पाऊल उचलू, असा इशारा यावेळी देण्यात आला. या पत्रकार परिषदेला अर्चना देशमुख, संजय डगली, अजय डबीर, मनीष त्रिवेदी, रामनारायण शर्मा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.