शासनाने शेतकऱ्यांसाठी संवेदनशीलता दाखवावी : अमर हबीब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 09:22 PM2018-02-20T21:22:50+5:302018-02-20T21:24:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १२ व १३ फेब्रुवारीला झालेल्या गारपिटीमुळे नागपूर जिल्हा व विदर्भातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री व शासनाच्या प्रतिनिधींनी या भागाचा दौरा करावा व संकटात असलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करून संवेदनशीलता दाखवावी, असे आवाहन किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी पत्रपरिषदेत केले. काटोलच्या शेतकऱ्यांसाठी आमदार आशिष देशमुख यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा असल्याचे सांगितले.
नुकत्याच झालेल्या गारपिटीमुळे संत्रा, गहू आणि इतर पिकांची नासाडी झाली आहे. शासनाने मात्र अद्याप कुठलाही मोबदला जाहीर केला नाही. मुख्यमंत्र्यांना अद्याप शेतकऱ्यांसाठी वेळ काढता न आल्याचा आरोप हबीब यांनी केला. काही कायद्यांनी शेतकऱ्यांचे हातपाय बांधले आहेत. हे कायदे रद्द होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना मदत करत राहावी लागणार असल्याचे ते म्हणाले. आमदार आशिष देशमुख हे गेल्या १२ दिवसापासून उपोषणाला बसले आहेत. मात्र शासनाने त्यांची दखल घेतली नाही. पहिल्यांदा कुणी आमदार शेतकऱ्यांसाठी प्रामाणिकपणे लढा देत आहे, त्यामुळे आ. देशमुखांच्या आंदोलनाला किसानपुत्र आंदोलनाचा पाठिंबा असल्याचे त्यांनी जाहीर केले.
यावेळी उपस्थित जवाहर चरडे यांनी आ. देशमुख यांच्या आंदोलनाबाबत माहिती दिली. मृगबहाराची संत्री गारपिटीमुळे नष्ट झाली आहेत. या संत्र्यांना २५ ते ३० हजार रुपये प्रतिटन भाव मिळतो. आंबियाबहारही नष्ट झाला आहे. त्यामुळे शासनाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना २ लाख १० हजार रुपये मदत द्यावी. गहू प्रति एकर १० क्विंटल होत असल्याने एकरी २० हजार रुपये व हरभऱ्यासाठी एकरी २८ हजार रुपये मदत करण्याची मागणी आ. आशिष देशमुख यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केल्याचे चरडे यांनी सांगितले.
१९ मार्चला राज्यव्यापी उपोषण
३२ वर्षांपूर्वी १९ मार्च १९८६ ला पवनार येथे पहिल्यांदा शेतकऱ्याने आत्महत्या केली होती. तेव्हापासून नापिकी व कर्जबाजारीपणामुळे सतत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. किसानपुत्र आंदोलनतर्फे अमर हबीब १९ मार्चला पवनार येथे एक दिवसाचे उपोषण करणार आहेत. मागील वर्षी दोन लाख लोक उपोषणात सहभागी झाले होते. यावेळी त्यापेक्षा जास्त होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहरात राहणाऱ्या शेतकरी पुत्रांनी शेतकऱ्यांप्रति आपुलकी दाखवून एक दिवस उपोषण करावे, असे आवाहन हबीब यांनी केले.