राज्यात सरकार जास्त दिवस टिकणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:20 AM2020-12-04T04:20:47+5:302020-12-04T04:20:47+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारबाबत जनतेच्या मनात विश्वास राहिलेला नाही. नंबरगेमच्या आधारावर सरकार चालत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारबाबत जनतेच्या मनात विश्वास राहिलेला नाही. नंबरगेमच्या आधारावर सरकार चालत आहे. मात्र हे सरकार जास्त दिवस राहणार नाही, असा दावा भाजपचे महाराष्ट्र प्रभारी व राष्ट्रीय महामंत्री सी.टी. रवी यांनी केला. बुधवारी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हेडगेवार स्मृतिमंदिर परिसर तसेच दीक्षाभूमीला भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
नागपूर ही पुण्यभूमी आहे. नागपूरमुळे देशाला प्रेरणा मिळाली आहे. मी राज्याच्या राजकारणाचा सखोल अभ्यास करत आहे. उद्या विधान परिषदेच्या निकालानंतर भविष्यातील राजकारणाची दिशा कळेलच. महाराष्ट्रात भाजपचे सरकार आल्यानंतर उत्तर प्रदेशच्या धर्तीवर गोहत्याबंदी तसेच लव्ह जिहाद विरोधी कायदा लागू करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
दीक्षाभूमीला भेट
सी.टी. रवी यांनी दीक्षाभूमीला भेट दिली व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थींचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी रेशीमबाग स्मृतिमंदिराला भेट दिली. त्यावेळी आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार व द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या समाधिस्थळाचे दर्शन घेतले.