आजपासून 'सरकार' नागपुरात : हिवाळी अधिवेशन उद्यापासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 12:23 AM2019-12-15T00:23:52+5:302019-12-15T00:25:31+5:30
हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासूनच सुरुवात होणार असली तरी संपूर्ण सरकार रविवारीच शहरात येणार आहे. महाविकास आघाडीचे हे पहिलेच अधिवेशन ठरणार असल्याने सरकारतर्फे तयारी करण्यात आली आहे तर विरोधक सरकारची कोंडी करण्यासाठी आक्रमक पवित्र्यात आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हिवाळी अधिवेशनाला सोमवारपासूनच सुरुवात होणार असली तरी संपूर्ण सरकार रविवारीच शहरात येणार आहे. महाविकास आघाडीचे हे पहिलेच अधिवेशन ठरणार असल्याने सरकारतर्फे तयारी करण्यात आली आहे तर विरोधक सरकारची कोंडी करण्यासाठी आक्रमक पवित्र्यात आहेत. रविवारी शहरात विरोधकांची बैठक होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील अधिवेशनात सरकारची भूमिका काय असेल हे स्पष्ट करणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दुपारी २ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन होणार आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेतर्फे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. सायंकाळी ५ वाजता ‘रामगिरी’ येथे चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर लगेच ते पत्रपरिषदेला संबोधित करतील. अधिवेशनात पुरवणी मागण्या मंजूर करण्यावर सरकारचा जोर राहणार आहे.
तर दुसरीकडे विरोधकांची सकाळी ११ वाजता रविभवन येथील कॉटेज क्रमांक ३ येथे बैठक होणार आहे. या बैठकीत चहापानात सहभागी होण्याबाबत अंतिम निर्णय होईल. या बैठकीला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे उपस्थित राहतील. सरकारची कोंडी करण्यासंदर्भातील मुद्द्यांवरदेखील यात चर्चा होईल.
अधिवेशन ठरणार वादळी
या अधिवेशनाचा कालावधी कमी असला तरी हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे वक्तव्य तसेच नागरिकत्व संशोधन विधेयकावरुन भाजप आक्रमक पवित्रा घेणार आहे. याशिवाय शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी अतिवृष्टी, विकास कामांवरील स्थगिती या मुद्द्यांवरुनदेखील सरकारला घेरण्यात येईल.
प्रश्नोत्तरे नाहीच, लक्षवेधीवर भर
विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज शनिवारपर्यंत निश्चित झाले आहे. त्यामुळे एकच आठवड्याचे अधिवेशन ठरेल, असे अंदाज लावले जात आहेत. सत्तास्थापना उशिरा झाल्याने यंदा अधिवेशनात प्रश्नोत्तरे राहणार नाहीत. त्यामुळे आमदारांचा भर लक्षवेधी सूचनांवर राहणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विधीमंडळ सचिवालयाला एक हजारांहून अधिक प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.
अधिवेशनाच्या कालावधीवरुन नाराजी
महाविकासआघाडी शासनाचे पहिलेच अधिवेशन विदर्भात होत असल्याने या भागाला न्याय देण्यासाठी जास्त दिवस अधिवेशन घ्यावे, अशी मागणी होती. परंतु प्रत्यक्षात केवळ सहाच दिवस अधिवेशन चालण्याची दाट शक्यता असल्यामुळे विदर्भातील आमदारांसह विविध संघटना व नागरिकांमध्येदेखील नाराजीचा सूर आहे. यावरुनदेखील सरकारला घेरण्याचा प्रयत्न होऊ शकतो.