सरकार, बीबीएफ पेरणी यंत्र आहे कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:07 AM2021-06-05T04:07:12+5:302021-06-05T04:07:12+5:30
उमरेड : बीबीएफ (रुंद वरंभा सरी) या कृषितंत्र पद्धतीने सोयाबीनची पेरणी करा, असे शासन-प्रशासन सांगत आहे. असे असले तरी ...
उमरेड : बीबीएफ (रुंद वरंभा सरी) या कृषितंत्र पद्धतीने सोयाबीनची पेरणी करा, असे शासन-प्रशासन सांगत आहे. असे असले तरी उमरेडसारख्या मोठ्या तालुक्यात केवळ दोनच शेतकऱ्यांकडे बीबीएफ पेरणी यंत्र उपलब्ध आहे. नवनवीन पद्धतीचा अवलंब करण्यासाठी युवा शेतकऱ्यांचा कल असला तरी, पाहिजे त्या प्रमाणात पेरणी यंत्रच उपलब्ध नसल्याने कृषी विभागाची धावपळ सुरू आहे. दुसरीकडे बीबीएफ पेरणी यंत्र मिळतील तरी कुठे, असा सवाल शेतकरी करीत आहेत.
उमरेड तालुक्यात यावर्षी खरिपाचे क्षेत्र ४५ हजार ५६५ हेक्टर आहे. यामध्ये १६ हजार ५०० हेक्टरमध्ये सोयाबीन, कपाशी २२ हजार ५००, तर धान १,८०० व तुरी ३,२०० हेक्टरच्या आसपास आहे. तालुक्यात बीबीएफ पद्धतीने पाच हजार हेक्टरच्या आसपास सोयाबीनची पेरणी होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
बियाणांची बचत, जलव्यवस्थापन, जमिनीची सुपीकता टिकविणे, उत्पादनात वाढ आदी फायदे या पद्धतीचा अवलंब केल्यास होऊ शकतो, असा सल्ला कृषी विभाग देत आहे. या संपूर्ण उपक्रमांमध्ये असंख्य शेतकरी सहभागी होत असले तरी बीबीएफ पद्धतीने पेरणीसाठी यंत्र अपुरे असल्याची समस्या पुढे आली आहे. यावर उमरेड तालुक्यातील कृषी विभागाने देसी जुगाड करीत कमी रकमेत यंत्र सज्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले आहे. यामुळे तालुक्यात आणखी सुमारे २५ शेतकऱ्यांकडे हे यंत्र उपलब्ध होणार आहे. असे झाल्यास उमरेड तालुक्यात बीबीएफ पद्धतीने पेरणीसाठी शेतकऱ्यांची संख्या वाढेल. पेरणीसाठी सारख्या अंतरावर साधारणत: चार फुटावर वरंबा तयार केला जातो. या पद्धतीमुळे तण नियंत्रण, पाण्याचा योग्य निचरा तसेच हवा खेळती राहून पाणी व हवा यांचे योग्य प्रमाण राखले जाते. यामुळे बियाणांची उत्तम उगवण व पिकांची जोमदार वाढ होण्यास ही पद्धत उपयुक्त ठरते. उत्पादन वाढविण्यास ही पद्धत उपयुक्त असली तरी शासनाने आधी अनुदान तत्त्वावर तातडीने पेरणी यंत्र उपलब्ध करून देणे गरजेचे होते. यंत्रच योग्य प्रमाणात उपलब्ध नाही आणि बीबीएफ पद्धतीचा मंत्र शासन देत आहे, अशी कठीण परिस्थिती असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे.
एकूणच कृषी धोरण आणि विविध योजनांची थट्टाच केली जात आहे, असा संताप संजय वाघमारे, दिलीप सोनटक्के, अश्विन उके, नागसेन निकोसे, महेश तवले, कुणाल मुळे, रोशन सेलोटे, सचिन भाकरे, चेतन बकाल, प्रणय धोंगडे, राजकुमार बेले आदी शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
असे आहे जुगाड यंत्र
अनेक शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर उपलब्ध आहे. असे असले तरी बीबीएफ पेरणी यंत्र फारसे नाहीत. अशावेळी ट्रॅक्टर पेरणी यंत्राच्या दोन्ही साइडला फास लावत थोडाफार बदल केला जात आहे. व्ही पात्यांचा उपयोग करीत पेरणीसाठी गरजेनुसार अवजार बनवित देसी जुगाड साधला जात आहे. यासाठी कृषी विभागसुद्धा कामाला लागला आहे.
--
तालुक्यात केवळ दोन बीबीएफ पेरणी यंत्र उपलब्ध आहेत. स्थानिक कारागिरांच्या माध्यमातून पेरणी यंत्र तयार होत आहेत. शिवाय टोकन पद्धतीनेही काही शेतकरी नियोजन आखत आहेत. कपाशीसाठी रुंद सरी वरंभा पद्धत, तर पट्टा पद्धतीचा अवलंब करीत पेरीव धानाकडेही अनेकांचा कल आहे.
- संजय वाकडे, तालुका कृषी अधिकारी, उमरेड