माओवाद निपटून काढण्यात सरकारला यश येईल
By admin | Published: May 15, 2015 02:38 AM2015-05-15T02:38:44+5:302015-05-15T02:38:44+5:30
माओवादाला आम्ही आव्हान म्हणून स्वीकारले आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत.
गृहमंत्री राजनाथसिंग यांची ग्वाही :
नक्षलग्रस्त भागातील समस्यांचा आढावा
नागपूर : माओवादाला आम्ही आव्हान म्हणून स्वीकारले आहे. या आव्हानाचा सामना करण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले जात आहेत. माओवाद निपटून काढण्यात सरकारला यश येईल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी केला. राज्यातील नक्षलग्रस्त भागातील स्थिती आणि तेथील समस्यांचा आढावा गुरुवारी रविभवनात संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतला. यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
गृहमंत्री म्हणाले, देशाच्या सर्व क्षेत्राचा आणि सर्व स्तराचा विकास व्हावा, अशी इच्छा असल्यामुळे आम्ही सत्तेत येताच माओवाद्यांशी चर्चा करून नक्षल समस्या सोडविण्याचे प्रयत्न केले. मात्र, चर्चेला त्यांची तयारी नाही आणि त्यातून या समस्येचे निराकरण होणार नसल्याचे ध्यानात आल्यामुळे आता माओवाद्यांच्या भाषेतच त्यांना उत्तर देण्याची सरकारने तयारी केली आहे. त्यासाठी नक्षलगस्त भागात सुसज्ज हत्यारे, मोठे मनुष्यबळ दिले जात आहे. आरआरपी-२ सारख्या योजना राबवून नक्षल समस्येला तोंड देण्यासाठी ‘अॅक्शन प्लान’सुद्धा तयार करण्यात आल्याचे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
गडचिरोली - गोंदियातील नक्षलग्रस्त भागात काय हवे, काय नको, त्याची स्थिती जाणून घेतली आणि आवश्यक सोयी, सुविधांसाठी प्रपोजल मागवून घेतल्याचेही त्यांनी सांगितले. येथे जे जे हवे ते उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाहीसुद्धा त्यांनी प्रारंभीच दिली. यावेळी खासदार अजय संचेती, सीआरपीएफचे निवृत्त महासंचालक विजयकुमार पोलीस महासंचालक संजीव दयाल उपस्थित होते. पत्रकारपरिषदेपूर्वी झालेल्या नक्षल आढावा बैठकीला विजयकुमार आणि दयाल यांच्यासह नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख अनुपकुमार सिंह, गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक रवींद्र कदम तसेच गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक उपस्थित होते. (प्रतिनिधी)