संविधानानेच सरकार चालेल; मुख्यमंत्री फडणवीस यांची दीक्षाभूमीवर ग्वाही
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2018 09:34 PM2018-10-18T21:34:17+5:302018-10-18T22:19:29+5:30
आज भारताची जी प्रगती होत आहे त्यामागे संविधान आहे, म्हणूनच या संविधानानेच सरकार चालेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या संविधानातून जीवनाचा मार्ग दिला. स्वातंत्र्य, समता, बंधूता ही मूलतत्त्वे दिली. देशाला पुढे कसे न्यायचे, शेवटच्या माणसाला, वंचिताला न्याय कसा द्यायचा, परिवर्तन कसे घडवायचे याचे मार्गदर्शन या संविधानातून मिळते. पुढील हजार वर्षे या संविधानाच्या माध्यमातून व्यक्तीला न्याय मिळेल. आज भारताची जी प्रगती होत आहे त्यामागे संविधान आहे, म्हणूनच या संविधानानेच सरकार चालेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिला.
परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने आयोजित ६२ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा गुरुवारी दीक्षाभूमीवर मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई होते. मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय रस्ते भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले, ऊर्जा व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापौर नंदा जिचकार आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, दीक्षाभूमीतून बाबासाहेबांनी धम्माचा मार्ग दिला. तथागत गौतम बुद्ध यांचा धम्म शिकविला. मानवतेची शिकवण देणाऱ्या पंचशीलचा मार्ग दाखविला. या देशाच्या संविधानाची निर्मिती करीत असताना देखील त्याच धम्माचे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीतून उतरले. स्वातंत्र्य, समता, बंधूता ही मूलतत्त्वे आपल्या संविधानाच्या माध्यमातून मिळाली. जगातील सर्वात उत्तम असे संविधान बाबासाहेबांनी दिले. त्याची एवढी ताकत आहे की ज्या-ज्या वेळी आमच्या समोर अडचणी निर्माण होतात, तेव्हा आम्हाला मार्ग दाखविते.
३२ हजार शाळांमधून संविधानाच्या मूल्यांचे शिक्षण
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, केंद्र सरकारने एकीकडे संविधानाचे वाचन झाले पाहिजे यासाठी पुढाकार घेतला आहे, तर महाराष्ट्र सरकारने ३२ हजार शाळांमधून संविधानाची मूल्ये शिकविणे सुरू केले आहे. यासाठी शिक्षकांना आम्ही प्रशिक्षण दिले आहे. या संविधान मूल्यांमुळे येणाºया पिढीमध्ये बदल होईल. देशामधील अन्याय, अत्याचार, भेदभाव दूर होईल. या देशामध्ये महिलांच्या प्रति सद्भावना निर्माण होईल.
इंदू मिलच्या जागेवर २०२०पर्यंत स्मारक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी इंदू मिलची जागा मिळावी यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. ज्या बाबासाहेबांमुळे आम्ही पंतप्रधान, मुख्यमंत्री होतो, त्याच बाबासाहेबांच्या स्मारकाकरिता एक इंच जमीन मिळत नव्हती. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी पुढाकार घेतला, त्यांनी मंत्रिमंडळात निर्णय घेऊन तीन हजार कोटींची जमीन मिळवून दिली. २०२०पर्यंत हे स्मारक पूर्ण करू, त्याचे लोकार्पण करू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
दीक्षाभूमीच्या विकासासाठी १०० कोटी
दीक्षाभूमीवर जागतिक दर्जाचा वारसा तयार होण्यासाठी ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. गेल्या वर्षी १०० कोटी रुपयांची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याचा पहिल्या हप्ता, ४० कोटींचा धनादेश या सोहळ्यात स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले यांना दिला. याशिवाय लागेल तेवढा निधी आम्ही उपलब्ध करून देऊ, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता ६५ नवे वसतिगृह
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता गेल्या चार वर्षांत ६५ नवे वसतिगृह बांधले, असे सांगून ते म्हणाले, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विदेशात जाऊन शिक्षण घेता यावे यासाठी १०० टक्के शिष्यवृत्ती देण्याची योजना तयार केली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाचा, राहण्याचा खर्च महाराष्ट्र सरकार करेल.