अंत्योदयाच्या विचारावर सरकारचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 01:09 AM2017-09-17T01:09:19+5:302017-09-17T01:09:32+5:30
पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी साम्यवादी व पुंजीवादी अर्थव्यवस्थेतील त्रुटींचा अभ्यास करून अंत्योदयाच्या विकासासाठी आर्थिक व सामाजिक विचार मांडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी साम्यवादी व पुंजीवादी अर्थव्यवस्थेतील त्रुटींचा अभ्यास करून अंत्योदयाच्या विकासासाठी आर्थिक व सामाजिक विचार मांडला. स्वत: प्रसिद्धीपासून दूर राहिले. जन्मलेल्या प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे व त्यासाठी लागणारी व्यवस्था उभी करणे हे आपले कर्तव्य आहे, हे त्यांनी सांगितले. त्यांच्या याच विचारावर समाजातील शेवटच्या घटकाच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकार काम करीत आहे, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
प्रयास बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे पं. दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘पं. दीनदयाल गाथा’ हे महानाट्य शनिवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या वेळी खा. डॉ. विकास महात्मे, आ. सुधाकर देशमुख, आ. अनिल सोले, आ. कृष्णा खोपडे, आ. सुधाकर कोहळे, महापौर नंदा जिचकार, आ.डॉ. मिलिंद माने, माजी खा. दत्ता मेघे आदी उपस्थित होते.
नितीन गडकरी म्हणाले, पं. दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेल्या अंत्योदयाचा विचार सामाजिक, आर्थिक चिंतनावर आधारित आहे. समाजातील शोषित, पीडित माणसाची परमेश्वर समजून सेवा करा. त्यांचा उद्धार करा, हाच आमच्या आर्थिक भूमिकेचा पाया आहे. हा विचार पुढे नेत केंद्र सरकारने जनधनअंतर्गत ३० कोटी बँक खाते उघडले आहेत. देशातील एक कोटी लोक सायकलरिक्षा ओढायचे. त्यांच्यासाठी ई-रिक्षा आणली. गरिबांचे हार्ट व कॅन्सरचे आॅपरेशन केले जात आहेत. नागपुरात ५० हजार गरिबांना फक्त तीन लाख रुपयात घर दिले जाणार आहे. या जनसेवेतून पं. दीनदयाल यांचा संकल्प पूर्ण करायचा असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्घाटन सोहळ्यानंतर गडकरी व फडणवीस या दोन्ही नेत्यांनी महानाट्य पाहिले. या महानाट्याच्या माध्यमातून पंडितजींचा विचार सामान्यांपर्यंत सहजपणे पोहचेल, असा विश्वास या दोन्ही नेत्यांनी व्यक्त केला.प्रमुख मार्गदर्शक जयप्रकाश गुप्ता यांनी महानाट्याच्या निर्मितीमागील भूमिका व त्यासाठी घेतलेल्या परिश्रमाची माहिती दिली. याप्रसंगी या महानाट्याचे निर्माता शक्ती ठाकूर, लेखक विनोद इंदूरकर व दिग्दर्शक जयंत देशमुख यांचा मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
फडवीसांनी केला गडकरींचा सत्कार
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात नितीन गडकरी यांना अतिरिक्त मंत्रालय सोपविण्यात आले. यानिमित्ताने यावेळी आयोजकांच्या विनंतीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गडकरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी जोरदार टाळ्यांनी या प्रसंगाला दाद दिली.
महानाट्यातून उलगडला जीवनपट
या महानाट्याच्या माध्यमातून पं. दीनदयाल उपाध्याय यांचा जीवनपट उलगडला. त्यांनी समाजाला दिलेला विचार मांडण्यात आला. पंडितजींची मुख्य भूमिका योगेश परिहार यांनी साकारली. याशिवाय नितीन पात्रीकर (यादोराव जोशी), शक्ती रतन (दत्तोपंत ठेंगडी), विनोद राऊत (अटलबिहारी वाजपेयी), अमोल तेलपांडे (गोळवलकर गुरुजी), संजय रंधे (बाळासाहेब देवरस), रमेश लखमापुरे (डॉ. शामाप्रसाद मुखर्जी), वत्सला अंबोणे (मामीजी), निकेतन सहारे (आॅफिसर), अंश रंधे (बूट पॉलिशवाला), दक्ष राठी (बाल स्वयंसेवक) यांनी या नाटकात भूमिका वठवल्या.राज्य सरकारचा बेस्ट आर्टिस्टचा अवॉर्ड विजेत्या भाजपाच्या सांस्कृतिक आघाडीच्या शहर उपाध्यक्ष प्रियंका ठाकूर यांनी या नाटकासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले. या नाटकाचे सादरीकरण भोपाळ व रायपूर, लखनौ येथेही होणार आहे.