गरजू विद्यार्थ्यांसाठी शासकीय सेवेचे ‘कॅटॅलिस्ट’ : महाराष्ट्र आर्य वैश्य समाजाचे पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 09:31 PM2019-05-11T21:31:42+5:302019-05-11T21:33:46+5:30
समाजात हुशार आणि बौद्धिक क्षमता असलेल्या मुलांची संख्या कमी नाही. पण अनेकदा गरीब परिस्थिती आणि अभावग्रस्ततेमुळे त्यांनी ठरविलेले ध्येय, मनात बाळगलेले स्वप्न करपून जातात. अशा गरीब, गरजू विद्यार्थ्यांची स्वप्ने अपूर्ण राहू नयेत, यासाठी त्यांना समाजातील सक्षम व्यक्ती, संस्थांकडून सहकार्याचा हात देणे गरजेचे आहे. असाच सहकार्याचा हात महाराष्ट्र आर्य वैश्य समाज या संस्थेने समाजातील गरजू तरुणांसाठी पुढे केला आहे. नेहमी समाजहिताचे उपक्रम राबविणाऱ्या संस्थेने अशा तरुणांना उच्च पदस्थ शासकीय सेवेत स्थान मिळावे यासाठी ‘कॅटॅलिस्ट’ म्हणून उभे राहण्याचे निश्चित केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : समाजात हुशार आणि बौद्धिक क्षमता असलेल्या मुलांची संख्या कमी नाही. पण अनेकदा गरीब परिस्थिती आणि अभावग्रस्ततेमुळे त्यांनी ठरविलेले ध्येय, मनात बाळगलेले स्वप्न करपून जातात. अशा गरीब, गरजू विद्यार्थ्यांची स्वप्ने अपूर्ण राहू नयेत, यासाठी त्यांना समाजातील सक्षम व्यक्ती, संस्थांकडून सहकार्याचा हात देणे गरजेचे आहे. असाच सहकार्याचा हात महाराष्ट्र आर्य वैश्य समाज या संस्थेने समाजातील गरजू तरुणांसाठी पुढे केला आहे. नेहमी समाजहिताचे उपक्रम राबविणाऱ्या संस्थेने अशा तरुणांना उच्च पदस्थ शासकीय सेवेत स्थान मिळावे यासाठी ‘कॅटॅलिस्ट’ म्हणून उभे राहण्याचे निश्चित केले आहे.
आर्य वैश्य समाज हा कायम व्यावसायिक राहिला आहे व हीच त्यांची ओळखही आहे. बदलत्या काळानुसार हा समाज बदलला. शिक्षित झालेल्या नव्या पिढीने व्यवसायाचा चेहरामोहरा बदलला. किराणा व्यापारच नाही तर स्वत:ची सॉफ्टवेअर कंपनी असलेले तरुण समाजात आहेत. डॉक्टर, इंजिनीअर अशा विविध क्षेत्रात समाजबांधवांनी आपल्या उन्नतीचा झेंडा रोवला आहे. मात्र या पार्श्वभूमीवर शासकीय सेवेत उच्च पदावरील नोकरीबाबत समाज नेहमी उदासीन राहिला आहे. समाजातील तरुण प्रशासकीय सेवेत नाहीत, असे नाही. दिवंगत अरुण बोंगीरवार यांनी सुरू केलेली परंपरा जिल्हाधिकारी पदावर असलेले राहुल रेकावार, विवेक भीमनवार असे अधिकारी पुढे चालवीत आहेत. पण त्यांची संख्या कमी आहे. प्रशासकीय सेवा म्हणजे व्यवस्था बदल आणि समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे समाजातील तरुणांना प्रशासकीय सेवेत स्थान मिळवून देण्यासाठी आर्य वैश्य समाज संस्थेने यावर्षीपासून ‘कॅटॅलिस्ट’ हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, सहायक विक्रीकर आयुक्त, तहसीलदार, जिल्हा उपनिबंधक, वित्त व लेखा अधिकारी अशा पातळीवरील शासकीय पदांसाठी एमपीएससी व तत्सम स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. समाजातील गरजू, होतकरू व गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षांची तयारी सहज घेता यावी, हा उद्देश ठेवून ‘कॅटॅलिस्ट’ हा उपक्रम सुरू करण्यात आला. याअंतर्गत महाराष्ट्रभरातून समाजातील विद्यार्थ्यांचे अर्ज मागविण्यात येतील व त्यातूनच निवड केली जाईल. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी प्रसिद्ध असलेले दि युनिक अकॅडमीमध्ये मार्गदर्शनाची संधी मिळेल. या अकॅडमीमधून आतापर्यंत हजारापेक्षा अधिक विद्यार्थी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी झाले असून, संघटनेने या अकॅडमीशी करार केला आहे.
केवळ मार्गदर्शनच नाही तर राज्यभरातून येणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना निवास व भोजनाची नि:शुल्क व्यवस्था करण्यात आली आहे. हा खर्च समाजातील दानदात्यांनी उचलला आहे. विशेष म्हणजे पहिल्याच वर्षी गडचिरोली, घाटंजी, उमरखेड, इसलापूर, बारशी अशा ग्रामीण व दुर्गम भागातून अनेक तरुणांचे अर्ज प्राप्त झाले व त्यातील आठ तरुणांची निवड करण्यात आली आहे. पदवीच्या अंतिम वर्षाला असलेल्या किंवा पदवी प्राप्त झालेल्या तरुणांना स्थान देण्यात येणार आहे. बौद्धिक क्षमता असून ही मुले परिस्थिती व अज्ञानामुळे स्पर्र्धा परीक्षेत टिकू शकत नाही. अशा मुलांना परीक्षेचा अर्ज करण्यापासून ते तयारी करण्यापर्यंत सखोल मार्गदर्शन कॅटॅलिस्टच्या माध्यमातून दिले जाणार आहे.
राज्याचे वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमासाठी कायमच पाठबळ दिले असून या उपक्रमासाठीही त्यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली. शिवाय माजी खासदार विलास मुत्तेमवार, राज्यमंत्री मदन येरावार, आमदार समीर कुणावार यांनीही मोलाचे सहकार्य दिले आहे. गरजू व होतकरू तरुणांच्या बौद्धिक क्षमतेला चालना देऊन त्यांना उच्च पदावरील नोकरीसाठी प्रेरित करणे, यापेक्षा समाज परिवर्तनाची श्रेष्ठ दिशा ती काय असू शकेल?
कॅटॅलिस्टची संकल्पना व संस्थेची टीम
समाजातील गरजू तरुणांसाठी मदतीचा हात पुढे करणारे महाराष्ट्र आर्य वैश्य समाज संस्थेचे उपाध्यक्ष राजू मुक्कावार यांच्या संकल्पनेतून ‘कॅटॅलिस्ट’ या प्रकल्पना जन्म झाला व समाजाने ही संकल्पना उचलून धरली. संस्थेचे अध्यक्ष गणेश चक्करवार, सचिव व्यंकटेश कुणावार यांच्यासह डॉ. सुधीर कुन्नावार, गजानन कोटावार, प्रशांत झुलकंठीवार, प्रशांत पिंपळवार, सचिन पोशट्टीवार, महेश रतकंठीवार, डॉ. सुरेंद्र कुकडपवार, मेहेरकुमार झिलपेलवार व सर्व सदस्यांनी प्रकल्पाला कार्यान्वित करण्यासाठी पुढाकारही घेतला. यातून समाज परिवर्तनाचा हा प्रकल्प सुरू झाला आहे. येत्या पाच वर्षात किमान पाच तरी विद्यार्थी अधिकारी करण्याचे ध्येय टीमने ठेवले आहे.
अनेक सामाजिक कार्य
आर्य वैश्य समाजाच्या विविध संघटना वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक सेवेत काम करीत आहेत. व्यंकटेश कुणावार यांच्या मार्गदर्शनात शिक्षण क्षेत्रात समाज सेवा फंड यासह ज्येष्ठ नागरिक मंडळ, आर्य वैश्य यूथ क्लब, महिलांचे वासवी लेडीज क्लब व वूमन्स ऑफ व्हीजन क्लब या संस्था सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत.