सरकारचे आर्थिक धोरण योग्य दिशेने : अध्यक्ष सीए ललित बजाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2020 09:45 PM2020-12-19T21:45:50+5:302020-12-19T21:47:39+5:30
President CA Lalit Bajaj, Government's economic policy, nagpur news कोरोना महामारीचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला असून, ती रुळावर आणण्यासाठी सरकारने राबविलेली विविध धोरणे योग्य दिशेने आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना महामारीचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला असून, ती रुळावर आणण्यासाठी सरकारने राबविलेली विविध धोरणे योग्य दिशेने आहेत. उद्योग पुन्हा नव्या जोमाने सुरू झाले आहेत. यावर्षी आयकर विभागाकडे जमा झालेल्या अॅडव्हान्स टॅक्सने रेकॉर्ड केला आहे आणि जुलैनंतर जीएसटी कलेक्शनही वाढले आहे. हे अर्थव्यवस्था वाढीचे संकेत असल्याचे मत इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) पश्चिम भारताच्या विभागीय कौन्सिलचे (विर्क) अध्यक्ष सीए ललित बजाज यांनी येथे व्यक्त केले.
आयसीएआय विर्क आणि नागपूर सीए संस्थेतर्फे धंतोली येथील आयसीएआय भवनात आयकर-जीएसटी विषयावर आयोजित टॅक्स परिषदेसाठी नागपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ललित बजाज म्हणाले, अर्थव्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी सरकार आणि कार्यालयीन स्तरावर सकारात्मक धोरणांचा अवलंब करण्यात येत आहे. त्या ठिकाणी सीए, व्यापारी आणि उद्योजकांचे म्हणणे ऐकण्यात येत आहे. सीए सरकारचे आर्थिक पॅकेज आणि धोरण आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवून त्याचे फायदे सांगण्यात यशस्वी ठरत आहेत. बजाज म्हणाले, कोरोना महामारीमुळे छोट्या उद्योगांना फायनान्सची अडचण निर्माण झाली होती. सीए सदस्यांनी बँका आणि वित्तीय संस्थांमार्फत या अडचणी दूर केल्या. सोबतच सरकार आणि बँकांच्या योजना व्यापाऱ्यांना सांगितल्या. सरकारचे आर्थिक पॅकेज लघु आणि मध्यम उद्योगांपर्यंत पोहोचले आहे. तसे पाहता छोटे व्यापारी अजूनही संकटात आहेत. कोरोना हेल्पलाईनद्वारे सीए इन्स्टिट्यूटने समाजसेवा केली आहे. पुढेही उपक्रम सुरू राहील. कोरोना काळात इन्स्टिट्यूटने सुरक्षितरीत्या परीक्षांचे यशस्वी आयोजन केले आहे.
पत्रपरिषदेत विर्कचे उपाध्यक्ष सीए विशाल दोशी, विर्क विकासा चेअरमन सीए अर्पित काबरा, रिजनल कौन्सिल सदस्य सीए अभिजित केळकर, आयसीएआय नागपूर चॅप्टरचे अध्यक्ष सीए किरीट कल्याणी, उपाध्यक्ष सीए साकेत बगडिया, सचिव सीए जितेन सागलानी, कोषाध्यक्ष सीए संजय अग्रवाल उपस्थित होते.
‘आयकर-जीएसटी’वर परिषद
आयसीएआय विर्कतर्फे आणि नागपूर चॅप्टरच्या सहकार्याने शनिवार धंतोली येथील कार्यालयात आयकर-जीएसटी विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले. सीए आशिष मोदी आणि सीए राजीव जैन यांनी सदस्यांना मार्गदर्शन केले. सीए किरीट कल्याणी म्हणाले, सीए सदस्यांसाठी नागपूर सीए कनेक्ट नावाने मोबाईल अॅपचे उद्घाटन झाले आहे. कोरोना महामारीत समाजाची सेवा करणाऱ्या सीए कोरोना हेल्पलाईन समूहाचे सदस्य सीए सतीश सारडा, सीए अश्विनी अग्रवाल, सीए अजय वासवानी, सीए आशिष मुकीम, सीए जेठालाल रुखियानी, सीए नरेश जखोटिया, सीए जुल्फेश शाह, सीए सचिन जाजोदिया, सीए अमर अग्रवाल, सीए नीलेश तोष्णीवाल यांचा सत्कार आणि सीए ललित बजाज यांच्या हस्ते अॅडमिन ब्लॉकचे उद्घाटन करण्यात आले.