सरकारची हिरवी झेंडी, मनपाची आमसभा होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 09:40 PM2020-06-19T21:40:34+5:302020-06-19T21:42:35+5:30
महाराष्ट्र शासनाने महापालिकेची सभा घेण्यास हिरवी झेंडी दिली आहे. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या पत्रात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ ठेवून व केंद्र व राज्य सरकारच्या कोविडबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून शनिवारी २० जूनला सकाळी ११ वाजता सुरेश भट सभागृहात सर्वसाधारण सभा होईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र शासनाने महापालिकेची सभा घेण्यास हिरवी झेंडी दिली आहे. शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या पत्रात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ ठेवून व केंद्र व राज्य सरकारच्या कोविडबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून शनिवारी २० जूनला सकाळी ११ वाजता सुरेश भट सभागृहात सर्वसाधारण सभा होईल. तसेच काही सदस्यांना आॅनलाईनद्वारे सभेच्या कामकाजात भाग घेता येईल. महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या आदेशामुळे सत्तापक्षात आनंद संचारला असून सभागृहात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना घेरण्याची तयारी केली आहे. तीन महिन्यानंतर ही सभा होत असून सत्तापक्षाला विरोधकांची साथ मिळण्याचे संकेत आहेत.
नागपूर शहरातील कोविडची सद्यस्थिती विचारात घेता सर्वसाधारण सभा घेणे संयुक्तिक होणार नाही, असा अभिप्राय नमूद करून सभेच्या आयोजनासाठी आयुक्तांनी शासनाचे मार्गदर्शन मागितले होते. शासन आदेशानुसार सभा घेण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला होता. महाराष्ट्र शासनाच्या ३ एप्रिल २०२० च्या निर्णयानुसार सभा घेण्याला अनुमती असल्याचा सत्तापक्षाचा दावा खरा ठरला आहे. आता सभागृहात आयुक्त उपस्थित राहतात की नाही. सत्तापक्ष आयुक्तांना कसे घेरतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मनपाची आर्थिक स्थिती बिकट आहे. विकास कामे ठप्प आहेत. पावसामुळे निर्माण झालेली समस्या अशा मुद्यावरून आयुक्तांना घेरण्याची शक्यता आहे. सत्तापक्ष नेता संदीप जाधव व वरिष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी पत्रकार परिषदेत सभा घेण्याला राज्य सरकारने परवानगी दिल्याची माहिती दिली. आयुक्त लोकप्रतिनिधींचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. कोविड-१९ च्या कालावधीत शहरात चेंबर, गडर लाईन, नाल्याची भिंत, खड्डे दुरुस्ती अशी कामे ठप्प पडली आाहेत. आयुक्त रजवाडा पॅलेसमध्ये ३०० लोकांची सभा घेऊ शकतात तर मग सभागृहात का घेता येत नाही, असा सवाल त्यांनी केला.
महापौरांनी शुक्रवारी आयुक्तांना पत्र लिहून ७२ तासात उत्तर मागितले. परंतु उत्तर मिळाले नाही. सभा घेण्याचा निर्णय तुम्ही घेतला आहे. त्यामुळे पत्राला उत्तर देणार नाही, असे आयुक्त मेलद्वारे कळवतात. हे समजण्यापलिकडे असल्याचे त्यांनी सांगितले.
आयुक्त उत्तर देण्याला घाबरतात
आयुक्त सभा घेण्याच्या विरोधात आहेत. कारण ते लोकप्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तर देण्याला घाबरतात, असा आरोप दयाशंकर तिवारी यांनी केला. नगरसेवकांचे अधिकार हिरावण्याचा प्रयत्न सुरू आहे. शहरातील विकास कामे ठप्प आहेत. राजकीय नेत्यांच्या आश्रयात मुंढे यांची मनमानी सुरू आहे. त्यांच्या विरोधात सत्तापक्ष अविश्वास आणणार नाही. सभागृहात जनहिताच्या प्रश्नांना पाठिंबा देण्याची भूमिका राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.