सरकार संघाची विचारधारा राबवतेय
By admin | Published: September 25, 2015 03:42 AM2015-09-25T03:42:48+5:302015-09-25T03:42:48+5:30
देशातील व राज्यातील सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यांवर काम करत आहे. संघाला देशात आपला ‘अजेंडा’ लागू करायचा आहे.
शरद पवारांची टीका : आरक्षणाची समीक्षा कशासाठी ?
नागपूर : देशातील व राज्यातील सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यांवर काम करत आहे. संघाला देशात आपला ‘अजेंडा’ लागू करायचा आहे. आरक्षणाच्या समीक्षेबाबत सरसंघचालकांच्या वक्तव्यातून हे स्पष्ट होतेच. मुळात ही विचारधारा शासन चालवते आहे ही चिंतेची बाब असून भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशाचे हे दुर्दैव आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी संघ तसेच केंद्रातील नेतृत्वावर टीका केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचा विदर्भस्तरीय मेळावा गुरुवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला. या हाऊसफूल्ल मेळाव्यात पवार यांनी मोदींनाही चांगलेच लक्ष्य केले. मेळाव्याला माजी केंद्रीय मंत्री खा. प्रफुल्ल पटेल, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, नागपूर शहराध्यक्ष अनिल देशमुख, जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) रमेश बंग, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, सुभाष ठाकरे, वसुधाताई देशमुख, आ. प्रकाश गजभिये, आ. निरंजन डावखरे, माजी आ. सुनील शिंदे प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी पवार म्हणाले, डॉ. पानसरे यांच्या हत्येत समाविष्ट असल्याचा संशय असलेल्या एका विशिष्ट विचारधारेची संघटना उघडपणे जहाल वक्तव्य करीत आहे. तरीदेखील शासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही. या विचारसरणीला खतपाणी घालण्याचे काम करण्यात येत आहे. संविधानाने दुर्बल घटकांना सक्षम करण्यासाठी आरक्षण प्रदान केले आहे. सरसंघचालकांना त्यात समीक्षा का अपेक्षित आहे, त्यांना आरक्षण बंद करायचे आहे का, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. विरोधी पक्षांत असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला प्रत्यक्ष जनतेत जाऊन समस्या जाणून घेण्याची संधी मिळाली आहे. कार्यकर्त्यांनी केवळ टीका करण्यात वेळ न घालवता, प्रत्यक्ष कार्य करण्यावरदेखील भर द्यावा, असे आवाहन पवार यांनी केले. पक्षामध्ये ५० टक्के नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे असा आग्रह प्रफुल्ल पटेल यांनी केला. सध्या ‘मार्केटिंग’चे युग आहे. त्यामुळे पक्षाने तरुण मतदारांना डोळ्यासमोर ठेवावे तसेच शहरातील समस्यांवरदेखील काम करावे, असे प्रतिपादन त्यांनी केले. संचालन प्रवीण कुंटे पाटील यांनी केले. आभार माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी मानले. (प्रतिनिधी)
मोदींवर सोडले बाण
पवार यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शाब्दिक बाण सोडले. शेतकऱ्यांच्या समस्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत, पण प्रथम ते कोणत्या देशात आहेत याचा शोध घ्यावा लागेल, असा चिमटा त्यांनी परदेश दौऱ्यावरून काढला. सेतमालाला ५० टक्के नफ्यासह हमीभाव देऊ म्हणणारे मोदी आता सरकार आल्यावर गंभीर दिसत नाहीत. फक्त मार्केटिंग चांगली आहे, अशी टीका करीत ‘अच्छे दिनचं घोडं नेमकं कुठे अडलं’, ही मोदींना सवाल करणारी कविताही पवारांनी मेळाव्यात वाचली.
काँग्रेसवरही टीका
या मेळाव्यादरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी कॉंग्रेसवरदेखील टीकेचा आसूड ओढला. कॉंग्रेसने राष्ट्रवादीच्या विरोधात प्रचार केला व पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले. तर शरद पवार शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरल्याचे पाहून भाजपा, शिवसेनेसह कॉंग्रेस नेत्यांच्या पोटात दुखले अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली.