सरकारने विदर्भाचा ‘बॅकलॉग’ दूर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2019 07:52 PM2019-12-04T19:52:48+5:302019-12-04T20:47:48+5:30

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भाच्या विकासाकडे सरकारने लक्ष द्यावे व विदर्भाचा ‘बॅकलॉग’ दूर करावा, असे प्रतिपादन केले आहे.

The government's job is to give the people a good days | सरकारने विदर्भाचा ‘बॅकलॉग’ दूर करावा

सरकारने विदर्भाचा ‘बॅकलॉग’ दूर करावा

Next
ठळक मुद्देअधिवेशन जास्त दिवस चालण्यावर देणार भरउपराजधानीतील अधिवेशनात नागपूर कराराचे पालन व्हावे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकासआघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर विदर्भाकडे दुर्लक्ष होईल की काय अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. परंतु विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भाच्या विकासाकडे सरकारने लक्ष द्यावे व विदर्भाचा ‘बॅकलॉग’ दूर करावा, असे प्रतिपादन केले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भातील शेतकरी, जनता, कामगार, बेरोजगार यांना न्याय मिळाला पाहिजे. विशेषत: विदर्भातील सिंचनाच्या मुद्द्याला सरकारने प्राधान्य द्यावे, असेदेखील ते म्हणाले. नागपूर पत्रकार क्लबतर्फे आयोजित ‘मीट द प्रेस’ च्या माध्यमातून त्यांनी पत्रकारांशी बुधवारी संवाद साधला.
नागपुरात होणाऱ्या विधानसभा अधिवेशनादरम्यान नागपूर कराराचे पालन व्हावे. तसेच या अधिवेशनात विदर्भाच्या मुद्द्यावर जास्त चर्चा व्हावी हा माझा प्रयत्न असेल. अध्यक्ष बनण्याअगोदरच हिवाळी अधिवेशनाचा कार्यक्रम निश्चित झाला होता. अधिवेशन सुरू झाल्यानंतर विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीसमवेत सत्राच्या अवधीबाबत चर्चा करु. पुढील अधिवेशन हे नागपूर कराराप्रमाणेच व्हावे याकडे लक्ष देईल, असे नाना पटोले यांनी सांगितले. विधानसभेचा अध्यक्ष या नात्याने मी सर्व बाजूंना समान न्याय देण्याचा प्रयत्न करेल. सभागृहातील सर्व सदस्य व पर्यायाने जनतेला न्याय मिळवून देण्याचा माझा प्रयत्न असेल, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला आ.विकास ठाकरे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, बबन तायवाडे, किशोर गजभिये, प्रशांत पवार, नागपूर पत्रकार क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र, राहुल पांडे प्रामुख्याने उपस्थित होते.

उद्धव ठाकरे जे बोलतात ते करतात
शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी की नाही हा राज्य सरकारचा विषय आहे. शेतकऱ्यांची चिंता दूर करु असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अगोदरच सांगितले आहे. उद्धव जे बोलतात ते तसेच करतात. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीसंदर्भात निर्णय घेणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे मत नाना पटोले यांनी व्यक्त केले.


इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र प्रगत
निवडणूकीच्या काळात कॉंग्रेसकडून राज्य अधोगतीला गेले असा आरोप करण्यात येत होता. आता काय भूमिका आहे यासंदर्भात विचारणा केली असता इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र बरेच प्रगत असल्याचे पटोले म्हणाले. नवीन सरकारला नवीन कर्ज उभे करायला अडचणी येतील. अगोदरच्या शासनकर्त्यांनी काय केले याचे रडगाणे न गाता विकासासाठी पावले उचलण्यावर भर दिला पाहिजे. हे शासन विपरित परिस्थितीत सत्तेवर आले आहे. परंतु जनतेचे चांगले दिवस आणणे हे सरकारचे काम आहे, असेदेखील ते म्हणाले.

शेतकरी आत्महत्या भूषणावह बाब नाही
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत आहेत ही नक्कीच भूषणावह बाब नाही. यासंदर्भात सरकारसमोर भूमिका मांडू तसेच विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करणाºया सदस्यांना बोलण्याची पूर्ण संधी देऊ, असे पटोले म्हणाले.

वन कायद्यामुळे रखडले प्रकल्प
गोसेखुर्द, धापेवाडा-२ यासारखे सिंचन प्रकल्प वन कायद्यामुळे रखडले. निधी असूनदेखील या कायद्यांमुळे तो खर्च करता आला नाही. उमरेडमधील जय वाघाच्या मृत्यूचे प्रकरण संसदेत उचलले होते. चौकशी केली असता याचे तार तर थेट मंत्रालयात जुळले असल्याचे आढळले. या प्रकरणामुळे सिंचन प्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला, असे नाना पटोले यांनी सांगितले.

नाना पटोले यांचे नागपुरात जंगी स्वागत
विधानसभेचे अध्यक्ष बनल्यानंतर पहिल्यांदा साकोलीचे आमदार नाना पटोले यांचे बुधवारी शहरात आगमन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बाहेर निघाल्यानंतर मोठ्या संख्येने एकत्र आलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत हार, फूल आणि गुलदस्ता देऊन नाना पटोले यांचे स्वागत केले.
विमानतळावर नाना पटोले यांचे शहर अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने जमलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा पुष्पगुच्छ देऊन पटोले यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर पटोले यांनी दीक्षाभूमीला भेट दिली. दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. यावेळी अभिजित वंजारी, विशाल मुत्तेमवार यांच्यासह स्मारक समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर पटोले यांनी मोठा ताजबाग येथे चादर अर्पण केली, नंतर टेकडीच्या गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी संबंधित ट्रस्ट व संस्थेकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार यांनी बजाजनगरात जाहीर सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या सत्काराला चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदियासह नागपुरातील पटोले यांच्या चाहत्यांनी उपस्थिती दर्शविली. विविध संघटनांचे पदाधिकारी व काँग्रेसचे कार्यकर्तेसुद्धा यावेळी उपस्थित होते. याप्रसंगी नगरसेवक संजय महाकाळकर, गिरीश पांडव, नंदा पराते, अवंतिका लेकुरवाळे, हुकूमचंद आमधरे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी हैदराबाद येथे अत्याचाराची बळी पडलेल्या दिशा हिला सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Web Title: The government's job is to give the people a good days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.