शासनाचे धोरण, हेच त्याच्या ‘नाले सफाईचे’ कारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:07 AM2021-06-11T04:07:35+5:302021-06-11T04:07:35+5:30
भिवापूर : सांडपाणी वाहून जाणाऱ्या नालीत हात घालायचा आणि ती गटारगंगा लाकडी पातेल्यात टाकायची. त्यातून सूक्ष्म अतिसूक्ष्म धातूचे कण ...
भिवापूर : सांडपाणी वाहून जाणाऱ्या नालीत हात घालायचा आणि ती गटारगंगा लाकडी पातेल्यात टाकायची. त्यातून सूक्ष्म अतिसूक्ष्म धातूचे कण झारायचे आणि त्यात एखाद्या सोन्याचा कण शोधायचा हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन. येणारी पिढी मात्र या गटारगंगेपासून दूर रहावी. यासाठी आईवडिलांनी काबाडकष्ट करत मुलाला शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्याला डी.एड., बी.ए.पर्यंत शिकविले. मात्र शासनाचे धोरण या मुलासाठी ‘नाले सफाईचे’ कारण ठरले. ‘त्या’ शिक्षित तरुणाचे हृदय हेलावणारे वास्तव शासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उठविणारे आहे. उमेश मनोहर गजपूरे रा. किटाळी (पुनर्वसन) असे या सोनेझारी समाजातील २८ वर्षीय तरुणाचे नाव आहे. डी.एड., बी.ए. पर्यंत शिकलेला उमेश नगर पंचायत अंतर्गत शहरात नाल्या सफाईचे काम करतो. सोनेझारी समाज पूर्वीपासूनच उपेक्षित असून शिक्षणापासूनही फार लांब आहे. त्यामुळे या समाजातील तरुण सरकारी, खासगी नोकरीत दिसत नाही. नदीनाल्यातील गटारगंगेत सोने, चांदी शोधण्यात अख्खे आयुष्य खर्ची घालणारे पालक आपल्या मुलांच्या भविष्याबाबतही चिंतेत आहे. त्यामुळेच मनोहर गजपुरे यांनी मुलाला उच्च शिक्षण देण्याचा संकल्प केला. उमेशही हुशारच! परिस्थितीवर मात करत त्याने बारावीत चांगले गुण मिळविले. २०१२ मध्ये त्याचा नंबर डी.एड. ला लागला. अनु.जमाती प्रवर्गात असल्यामुळे शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला. दोन वर्षात त्याने डी.एड.चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर बी.ए. द्वितीय वर्ष पूर्ण करून तृतीय वर्षाला प्रवेश घेणार अशातच त्याचे जातपडताळणी प्रमाणपत्र अवैध असल्याचे पत्र मिळाले. त्यामुळे उमेशला वसतिगृहाबाहेर पडावे लागले. सोनेझारी समाजबांधवाचा जात प्रमाणपत्र आणि पडताळणी प्रमाणपत्राचा लढा वर्षानुवर्ष सुरू आहे. मात्र तिढा सुटण्याचे नाव नाही. अशात जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे शिक्षण व नोकरीचे मार्गही बंद झाले. असे एक ना अनेक प्रश्न स्वत:च्या अंतरमनाला विचारत, उमेशने गाव जवळ केले. तेव्हापासून तो नगर पंचायत अंतर्गत कंत्राटी तत्वावर शहरात नाल्या सफाईचे काम करतो. सोनेझारी समाजाच्या जात पडताळणी प्रमाणपत्राचे हे धोरण उमेशच्या उद्ध्वस्त भविष्याचे कारण ठरले आहे.
सोनेझारी आणि झारेका
सोनेझारी समाज अनूसूचित जमाती प्रवर्गात येत असला तरी त्यांना जात प्रमाणपञ मिळत नव्हते. वर्षानुवर्षे त्यासाठी लढा सुरू होता. २००९ मध्ये जात प्रमाणपत्राचा तिढा सुटला. त्यामुळेच उमेशला डी.एड., बी.ए. करण्याची संधी मिळाली. मात्र आता जात प्रमाणपत्र मिळत असले तरी जात वैधता प्रमाणपत्र मिळत नाही. कागदपत्रात सोनेझारी हा शब्द असला तरी त्यापुढे झारेका हा उल्लेख नसल्यामुळे जात वैधता प्रमाणपत्राचा तिढा कायम आहे.
--
आमचा समाज उपेक्षित असल्यामुळे तरुण बांधव शिक्षण व नोकरीपासून वंचित आहे. गावातील सर्वच तरुण नाले सफाईचे काम करतात. त्यामुळे समाजातून एखादा शिक्षक तयार झाल्यास समाजाला दिशा मिळेल या उद्देशाने वडिलांनी मला शिक्षक बनविण्याचे स्वप्न बघितले. मात्र जात वैधता प्रमाणपत्रामुळे त्यांच्या आणि माझ्या स्वप्नांचा चुराडा झाला.
- उमेश गजपुरे, शिक्षित तरुण