मधुकरराव किंमतकर यांना मान्यवरांची श्रद्धांजली : राज्यपाल, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 12:08 PM2018-01-04T12:08:24+5:302018-01-04T12:09:13+5:30
आॅनलाईन लोकमत
नागपूर:
नागपूर : माजी मंत्री व विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे तज्ज्ञ सदस्य अॅड.मधुकरराव किंमतकर यांच्या निधनावर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. माजी मंत्री अॅड. मधुकरराव किंमतकर यांच्या निधनाने विदर्भातील विविध प्रश्नांची अचूक जाण असलेला तसेच विदर्भाच्या विकासाचा सतत ध्यास घेतलेला मार्गदर्शक नेता गमावला आहे. त्यांच्या निधनाने विदर्भ चळवळीचे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया राजकीय आणि विदर्भवादी नेत्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
आदर्श लोकप्रतिनिधी गमावला
अॅड. किंमतकर महाराष्ट्रातील एक अभ्यासू आणि लढवय्ये नेते होते. राज्याच्या आणि विशेषत: विदर्भाच्या प्रश्नांचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. राज्याच्या विकासासाठी ते आयुष्यभर पोटतिडकीने झटले. विकासविषयक प्रश्न मांडताना त्यांनी कधीही पक्षीय अभिनिवेश बाळगला नाही. विदर्भाच्या न्याय्य मागण्यांसाठी ते अनेकदा भेटत व भेटीनंतर सर्व स्तरावर आपल्या मागण्यांचा पाठपुरावा करत. त्यांची बुद्धिमत्ता आणि समस्यांचे विश्लेषण करण्याची हातोटी विलक्षण होती. त्यांनी सामान्य जनतेशी असलेली आपली नाळ आयुष्यभर जपली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने लोककल्याणाची कळकळ असलेला एक आदर्श अभ्यासू लोकप्रतिनिधी गमावला आहे.
-चे. विद्यासागर राव, राज्यपाल, महाराष्ट्र
ज्येष्ठ मार्गदर्शकाला मुकलो
विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी पक्षविरहित भूमिका घेत, अनेकांना प्रेरणा देणारे ज्येष्ठ नेते मधुकरराव किंमतकर यांच्या निधनाने एका ज्येष्ठ मार्गदर्शकाला मुकलो आहे. शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केले. रामटेक भागातून पुढे आमदार झाल्यानंतर त्यांनी आदिवासी शेतकऱ्यांना सिंचन सुविधा देण्याचा ध्यास घेतला. तेथूनच त्यांचा सिंचनासाठी संघर्ष सुरू झाला आणि तो शेवटपर्यंत राहिला. विदर्भाच्या सिंचनाचा अनुशेष दूर झाला पाहिजे, त्यासाठी सर्वपक्षीय आमदारांनी एकजूट झाले पाहिजे, यासाठी ते सतत आग्रही राहत. पाणी, सिंचन आणि अनुशेष यासाठी कुणालाही मार्गदर्शन हवे असेल तर ते हक्काने मामासाहेबांच्या घरी जायचे. मी सुद्धा अनेकदा त्यांना भेटून मार्गदर्शन घेत होतो.
-देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
अभ्यासू व्यक्तिमत्त्व गमावले
अॅड. किंमतकर हे अभ्यासू, सर्वसमावेशक आणि चिंतनशील व्यक्तिमत्त्व होते. विदर्भाच्या अनुशेषाबाबत त्यांचा अभ्यास दांडगा होता. विषयाचे ज्ञान, तो सोडविण्यासाठी पाठपुरावा करण्याची शैली आणि प्रसंगी कठोर व स्पष्ट भूमिका घेता त्यांचा स्वभाव मला अधिक आवडत असे. विदर्भाच्या विकासासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. विदर्भातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा खरा मार्गदर्शक गमावला. त्यांच्या निधनाने सामाजिक व राजनैतिक क्षेत्राची हानी झाली आहे.
-नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री
प्रश्नांची जाण असलेला नेता गेला
अॅड. मधुकरराव किंमतकर यांच्या निधनाने विदर्भातील विविध प्रश्नांची अचूक जाण असलेला तसेच विदर्भाच्या विकासाचा सतत ध्यास घेतलेला मार्गदर्शक नेता हरविला आहे. विदर्भ विकासावर त्यांचा अभ्यास व व्यासंग अतिशय दांडगा होता. विदर्भाच्या सिंचनाचा अनुशेष दूर झाला पाहिजे यासाठी पक्षीय मतभेदाच्या भिंती बाजूला सारत सर्व आमदारांनी एकत्र येऊन संघर्ष केला पाहिजे यासाठी त्यांनी नेहमीच आग्रही भूमिका घेतली. त्यांचे मला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. त्यांच्या निधनाने एक कर्तव्यदक्ष मंत्री, अभ्यासू व मार्गदर्शक नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे.
-सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री
अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला मुकलोे
जिल्ह्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले अॅड. मधुकरराव ऊर्फ मामा किंमतकर यांच्या निधनामुळे विदर्भातील अभ्यासू व्यक्तिमत्त्व गमावले आहे. सिंचन, रस्ते, कृषिपंप आदी विषयांचा त्यांनी प्रचंड अभ्यास करून विदर्भाचा व जिल्ह्याच्या विकासाचा अनुशेष दूर करण्यास मदत केली. राज्यपालांनी तयार केलेल्या विदर्भ वैधानिक मंडळावर त्यांची नियुक्ती झाली. अभ्यासक व संशोधनवृत्तीमुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले.
- चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री.
विदर्भ विकासासाठी झटणारे नेतृत्व
ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी मंत्री मधुकरराव किंमतकर यांच्या निधनाने विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील असणारे नेतृत्व हरपले आहे. मधुकरराव किंमतकर आयुष्यभर काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ होते. वित्त व नियोजन, कामगार विधी व न्याय खात्याचे मंत्री म्हणून राज्याच्या विकासात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांचा दांडगा जनसंपर्क होता व त्यामुळे लोकांच्या व्यथांची, प्रश्नांची त्यांना इत्थंभूत माहिती असायची. एक अभ्यासू व जनसामान्यांशी नाळ जोडलेले नेते म्हणून त्यांची प्रतिमा होती.
-खा.अशोक चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
विदर्भाचा संग्रहकोश हरविला
किंमतकर यांच्या रूपात स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाला अभ्यासू बळ देणारा विदर्भाचा चालताबोलता संग्रहकोशच हरविला आहे. मधुकररावांचे विदर्भ विकासात मौलिक योगदान राहिले. विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी त्यांनी सरकारला बाध्य केले. विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या माध्यमातून त्यांनी विदर्भ विकासासाठी मोठे प्रयत्न केले. ‘लोकमत’ परिवाराचे ते घनिष्ट स्नेही होते. त्यांच्या निधनाने मी माझा ज्येष्ठ मित्र गमाविला आहे.
-विजय दर्डा, ‘लोकमत’च्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार
मार्गदर्शक गमावला
ज्येष्ठ विदर्भवादी नेते अॅड. मधुकरराव किंमतकर यांच्या निधनाने माझा मार्गदर्शक गमावला आहे. सिंचन, रस्ते, आरोग्य आदीबाबत त्यांचे मार्गदर्शन मिळत होते. विदर्भ विकास हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय. या विषयावरचा त्यांचा अभ्यास आणि व्यासंग अतिशय दांडगा होता. विदर्भाचा सिंचनाला अनुशेष भरून निघण्यासाठी त्यांनी अखेरपर्यंत लढा दिला. - कृपाल तुमाने, खासदार.
विदर्भाचा मार्गदर्शक हरपला
माजी मंत्री अॅड. मधुकरराव किंमतकर यांच्या निधनाने विविध प्रश्नांची अचूक जाण असलेला विदर्भाचा मार्गदर्शक नेता गमावला आहे. त्यांना विदर्भ विकासाचा ध्यास होता. या विषयावर त्यांचा अभ्यास अतिशय दांडगा होता. विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरून निघाला पाहिजे, विदर्भ हा सिंचनाने परिपूर्ण होऊन सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती.
- अनिल देशमुख, माजी मंत्री.
विदर्भाचा सुपुत्र हिरावला
विदर्भाचे ज्येष्ठ नेते, विचारवंत, अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक आणि राज्याचे माजी मंत्री अॅड. मधुकरराव किंमतकर ऊर्फ मामा यांच्या निधनाने विदर्भाचा एक सुपुत्र काळाने हिरावला आहे. अॅड. किंमतकर म्हणजे महाराष्ट्राच्या अर्थविषयाचे एक चालते-बोलते आणि फिरते असे विद्यापीठच होते. त्यांच्या निधनाने आपण सर्वांनी एक पितृतुल्य मार्गदर्शक गमावला आहे.
- राजेंद्र मुळक, माजी मंत्री.
विदर्भ चळवळीला तोटा
विदर्भाचे ज्येष्ठ नेते अॅड. मधुकरराव किंमतकर यांचा निधनामुळे विदर्भ विकास संकल्पनेचा उत्तम नेता गमावला आहे. त्यांच्या जाण्याने विदर्भाची मोठी हानी झाली आहे. विदर्भ चळवळीला तोटा झाला आहे. १९८० ला विधानसभेत पहिल्यांदा त्यांनी विदर्भाची मागणी केली आणि त्यासाठी आजपर्यंत त्यांनी प्रभावी लढत दिली. त्यासाठी मी साठे यांना साकडे घातले आणि इंदिराजींकडे गेलो. विदर्भाचा मुद्दा त्यांनी ठामपणे मांडला.
- गेव्ह आवारी, माजी खासदार.
तत्त्ववेत्ता व मार्गदर्शक हरपला
गाढे अभ्यासक आणि माजी मंत्री अॅड. मधुकरराव किंमतकर त्यांच्या निधनाने विदर्भाची हानी झाली असून एक तत्त्ववेत्ता आणि मार्गदर्शक हरपला आहे. त्यांच्या निधनाने व्यक्तिगत हानी झाली आहे. रामटेक नगरभूषण पुरस्कार रामटेक येथे स्वीकारल्यानंतर त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना इस्पितळात भरती केले. मी आणि मामा रविवारी नितीन गडकरी यांची भेट घेणार होतो. त्यांच्या स्मृती नेहमीच प्रोत्साहन आणि प्रेरणा देत राहील.
- कपिल चंद्रायण, विदर्भ अभ्यासक.
हानी भरून निघणे कठीणच
अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, तत्त्ववेत्ता व विदर्भ विकासाचा ध्यास असणारे ज्येष्ठ नेते माजी मंत्री मधुकरराव ऊर्फ मामा किंमतकर यांच्या निधनाने झालेली हानी भरून निघणे कठीणच आहे. विदर्भाच्या सिंचनाचा अनुशेष भरून निघण्यासाठी त्यांनी लढा दिला. प्रत्येक प्रश्नाचा सखोल अभ्यास असल्यामुळे विदर्भाचा प्रश्न विधानसभेत मांडला. त्यांनी लेखन सुरू केले. विदर्भाचा खंदा पुरस्कर्ता हरवला.
- धनंजय धार्मिक, विदर्भवादी नेते.