राज्यपालांच्या दौऱ्यामुळे कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:12 AM2021-09-16T04:12:44+5:302021-09-16T04:12:44+5:30
नागपूर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. परंतु बुधवारी राज्यपालांच्या कार्यक्रमाचे कारण देत विद्यार्थ्यांना ...
नागपूर. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत. परंतु बुधवारी राज्यपालांच्या कार्यक्रमाचे कारण देत विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये आत येण्याची परवानगीच नाकारण्यात आली. त्यामुळे बाहेरगावाहून आलेल्या विद्यार्थ्यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला.पदव्युत्तर विभागांची प्रवेशप्रक्रिया सुरू असून विद्यार्थी कॅम्पसमध्ये येणे-जाणे करत आहे. मात्र राज्यपालांचा कार्यक्रम असल्याने प्रवेश प्रक्रियेलाच जणू एका दिवसाची सुटी देण्यात आली. आश्चर्याची बाब म्हणजे कार्यक्रम बऱ्यापैकी दूर असूनदेखील विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये प्रवेश नाकारण्यात आला.
प्रशासनाला कुणाची भीती वाटते ?
राज्यपालांचा कार्यक्रम सायंकाळी चार वाजता होता. परंतु सकाळपासूनच कॅम्पसचे मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले होते. यासोबतच विद्यार्थ्यांना कॅम्पस परिसरात जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला. विशेष म्हणजे कुठलेही अधिकृत परिपत्रक विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले नाही. विद्यापीठ विद्येचे मंदिर असताना तेथे प्रवेश नाकारणाऱ्या प्रशासनाला नेमकी कुणाची भीती वाटते असा प्रश्न विद्यार्थ्यांना उपस्थित केला.