राज्यपालांच काम संविधानानुसारच, त्यांना टार्गेट करण अयोग्य : देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2022 04:48 PM2022-03-05T16:48:55+5:302022-03-05T18:29:45+5:30
राज्यपाल ही संवैधानिक पदावर बसलेली व्यक्ती आहे. ते संवैधानिक पद्धतीनेच काम करतात, त्यामुळे त्यांना टार्गेट करणे चुकीचे असल्याचे फडणवीस म्हणाले.
नागपूर : राज्यपाल ही संवैधानिक पदावर बसलेली व्यक्ती आहे. ते संवैधानिक पद्धतीनेच काम करतात. परंतु, राज्य सरकारचे काम त्यानुसार नाही. जेव्हा राज्यपाल त्यावर प्रकाश टाकतात तेव्हा त्यांना टार्गेट केले जाते, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
आज ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते. यावेळी राज्यापालांवरील टीकेला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय. जाणीवपूर्वक असंवैधानिक कृती करायची आणि मग राज्यपालांविरुद्ध बोलायचं, एक प्रकारचा नरेटिव्ह तयार करायचा सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचेही फडणवीस म्हणाले. यावेळी,फोन टॅपिंग प्रकरणावर प्रश्न विचारला असता, हे ऐकून आपले मनोरंजन होत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
दरम्यान, विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीलाच राज्यपालांना आपले अभिभाषण अर्धवट सोडून जावे लागले. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांनी गोंधळास सुरुवात केली व राज्यपाल ठरल्याप्रमाणे भाषण सोडून निघून गेले. त्यांनी ‘जय हिंद’ही म्हटले नाही व ‘जय महाराष्ट्र’ही म्हटले नाही. राष्ट्रगीत होईपर्यंतही राज्याचे घटनात्मक प्रमुख थांबले नाहीत. महाराष्ट्राचे राज्यपाल गोंधळी विरोधी पक्षाचे नेतृत्व करतात असे म्हणत शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून राज्यपाल आणि भाजपवर टीकेचा बाण सोडला.