गोविंद पानसरेंना अभिवादन
By admin | Published: February 21, 2016 02:57 AM2016-02-21T02:57:34+5:302016-02-21T02:57:34+5:30
करण्यासाठी ...
भाकप, भारिप बहुजन महासंघ, बोल्शेविक पार्टी, अंनिसचा मोर्चा
नागपूर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त आणि त्यांच्यावर झालेल्या भ्याड हल्याचा निषेध करण्यासाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारिप बहुजन महासंघ, बोल्शेविक पार्टी आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने संविधान चौकात निषेध मोर्चाचे आयोजन करून त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आयोजित संविधान चौकातील निषेध मोर्चात भाकपचे वरिष्ठ नेता मोहनदास नायडु, जिल्हा सचिव मधुकर मानकर, आयटकचे राज्य सरचिटणीस श्याम काळे, पांडुरंग दुर्गे, जयश्री चहांदे, रंजना काळे, गीता महाजन, सुनिता शेंद्रे, संगीता महाजन, उषा चारभे, फॉरवर्ड ब्लॉकचे अरुण वनकर, मार्क्सवादी कम्युनिष्ठ पक्षाचे अमृत मेश्राम, आयटकचे सुकुमार दामले, भारिप बहुजन महासंघाचे मिलिंद पखाले यांची प्रमुख उपस्थिती होती. मोर्चात सहभागी विविध पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी धर्मवाद मुर्दाबाद, ‘केंद्र शासन होश मे आओ’, ‘आम्ही सारे पानसरे’, ‘हमे चाहिए आजादी’ आदी घोषणा देऊन केंद्र शासन आणि भारतीय जनता पक्षाप्रति आपला रोष व्यक्त केला. मोर्चाचा समारोप करताना सुकुमार दामले म्हणाले, माणसे मारता येतात, परंतु विचार मारता येत नाहीत. पानसरेंनी आपल्या जीवनात आपल्यासारखे असंख्य कार्यकर्ते घडविले. केंद्र शासन आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशात सुरू केलेल्या दहशतवादाचा त्यांनी निषेध केला. गांधीचा खून करणारेच आपल्याला देशभक्त म्हणून घेत असल्याचे सांगून त्यासाठी संघर्षाशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(प्रतिनिधी)