ओबीसींचा उद्रेक होण्यापूर्वी सरकारने जरांगे यांचे आंदोलन संपवावे - विजय वडेट्टीवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 12:31 PM2023-09-11T12:31:49+5:302023-09-11T12:34:18+5:30
ओबीसींचे आंदोलन चिघळले तरी मी रस्त्यावर उरतेल, वडेट्टीवार यांचा इशारा
नागपूर : मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसीमध्ये आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंदोलन करीत आहेत. हे आंदोलन संपावे ही सरकारची जबाबदारी आहे. ओबीसींच्या भावनांचा उद्रेक होऊ नये म्हणून सरकारने आंदोलन संपवावे, असा इशारा विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिला.
नागपुरात सुरू झालेल्या कुणबी- ओबीसी आंदोलनाला भेट दिल्यानंतर वडेट्टीवार म्हणाले, ही लढाई राजकीय पक्षाची नाही. ओबीसीची जनसामान्य लोकांची ही लढाई आहे. ओबीसीच्या हक्कासाठी जो लढत असेल त्याला पाठिंबा देणे आमचे कर्तव्य आहे. इथे राजकीय फायदा बाजूला सरून राजकीय बळ देण्याचे काम केले तरच होऊ शकेल. राजकीय पक्षाचा हस्तक्षेप नसावा ही कृती समितीची भूमिका योग्य आहे. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊन धक्का लावू नये, अशी भूमिकाही वडेट्टीवार यांनी मांडली.
ओबीसीचे आंदोलन चिघळले तरी मी रस्त्यावर उरतेल. जरांगे यांना विनंती करण्याच्या पेक्षा सरकारने ईडब्ल्यूएसच्या धर्तीवर स्वतंत्र आरक्षण द्यावे व त्यासाठी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचा ठराव संसदेत मंजूर करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
ओबीसी ‘ए’ व ‘बी’चा पर्याय मागे घेतला
वडेट्टीवार म्हणाले, मराठा समाजाला ओबीसीत सामावून घेत आरक्षण देण्यासाठी ओबीसी ‘ए’ व ‘बी’चा पर्याय आपण सुचविला होता. पण ओबीसी समाजाने विरोध केल्याने मी आपली ही भूमिका मागे घेतली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. गेल्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हा पर्याय सुचवला होता, असे सांगत त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या टीकेला उत्तर दिले.